हैदराबाद : कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरु होतो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणं मार्गशीर्ष महिन्यालाही आधिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. तसंच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत (last Margashirsha Guruvar2024) केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रतामुळं भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून माहिला महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात.
पूजा कशी करावी? : गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकू लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाका. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा.
महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं का नाही? : मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. परंतु, या वर्षी शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी (Ekadashi) आली आहे. त्यामुळं उद्यापन करावं की नाही?, सुवासिनीला जेवण्यास कसं बोलवावं? असे अनेक प्रश्न माहिलांना पडले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. दोन्हींचा काहीही संबंध नाही. त्यामुळं उद्यापन अवश्य करावं. ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावं. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवा. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी पूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे.