Mahashivratri 2025: 'महाशिवरात्री' हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो, या दिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचा म्हणजे शिवाचा वास असतो, अशी श्रद्धा आहे. पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला 'महाशिवरात्री' साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह (Shiv Parvati Marriage Ceremony) झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव 'महाशिवरात्री' या नावानं प्रचलित झाला आहे.
महाशिवरात्री 2025 मुहूर्त : पंचांगानुसार महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते, जे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल. तर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल, म्हणून महाशिवरात्री फक्त 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.
व्रताची पूजा करण्याची पद्धत: सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची पूजा करावी. यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभ मुहूर्तावर पूजा करावी. घरी देखील देवघर स्वच्छ करावे. मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून त्यावर बेलपत्र, आक-धतुरा, तांदूळ इत्यादी टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावं. जवळपास शिवमंदिर नसेल तर घरात मातीचे शिवलिंग बनवून पूजा करावी.
भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह : भगवान शिव आणि आदीशक्ति पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात 'महाशिवरात्री'चा सण साजरा केला जातो. भगवान शिवाला आपल्या पतीरूपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली होती. शिव तपस्येनं प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला, अशी श्रद्धा आहे.