हैदराबाद : कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण (Dhanteras) साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी मंगळवार, 29 ऑक्टोबरला आहे. असं मानलं जातं की, या दिवशी समुद्रमंथनातून अमृताचं भांड बाहेर पडलं आणि देवांचे वैद्य धन्वंतरी हे अमृत पात्र घेऊन प्रकट झाले. त्यामुळं आरोग्यासाठी या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस कुबेराचाही दिवस मानला जातो. या दिवशी धन-समृद्धीसाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशी खरेदीचा मुहूर्त :यंदाधनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. मंगळवार 29 ऑक्टोबरला पहिला मुहूर्त सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून ते 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त हा दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. तसेच संध्याकाळच्या मुहूर्तावर ही खरेदी करू शकता. संध्याकाळचा मुहूर्त हा 5 वाजून 38 मिनिटांपासून के 6 वाजून 04 मिनिटांपर्यंत आहे.
पूजेचा मुहूर्त :धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते. सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटं ते 8 वाजून 31 मिनिटं या वेळेत पूजा करता येईल. याचा अर्थ धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टींची करा खरेदी : तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, लक्ष्मी किंवा गणपतीची मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच तांबा, पितळ, चांदीची भांडी विकत घेणंही शुभ आहे.