नाशिक Akshaya Tritiya 2024: साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात पवित्र मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. आज अक्षय्य तृतीया आहे. तसंच या दिवशी भगवान परशुराम जयंती आणि भगवान बसवेश्वर जयंती देखील साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयाचा अर्थ 'कधीही नाश होत नाही' असा होतो. या दिवशी केलेले जप, तप, दान, ज्ञान हे अक्षय्य फलप्राप्ती देणारे असते, म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोतोपुराण आणि स्कंदपुराण अक्षय्य तृतीयाचा उल्लेख आढळतो. या दिवशी केलेलं शुभ कार्याचं श्रेष्ठफळ मिळतं. तसंच या दिवशी देवांचं आणि पितरांचे विशेष पूजन केलं जातं.
भगवान विष्णूचा प्रिय महिना : वैशाख महिना हा भगवान विष्णूचा अत्यंत आवडता महिना आहे. म्हणून या दिवशी विशेषतः विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा व्यक्ती सगळ्या पापापासून मुक्त होतो, असं भविष्य पुराणातील मध्यम पर्वात सांगण्यातल आलंय. अक्षय्य तृतीयेला विशेषतः मोदक, गुळ आणि कापुराच्या साहाय्यानं जलदान केल्यास विशेष फलप्राप्ती होते. असं मानलं जातं की जी लोक हे आज दान आणि पुजेचं कार्य करतात त्यांची ब्रह्मलोकाची प्राप्ती होती.