नागपूर Yogi Adityanath Sabha : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज (8 एप्रिल) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जोरदार प्रचार केला. त्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि भंडारा येथे भाजपाच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. पश्चिम नागपुरात झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारनं या दहा वर्षांत केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला. याशिवाय नागपूरसह देशाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात उंचीवर घेऊन जाण्यात नितीन गडकरी यांचं मोठं योगदान असल्याचंही ते म्हणाले.
मतदारांसाठी स्पेशल ऑफर : यावेळी बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी मतदारांसाठी मोठी ऑफर दिली. ते म्हणाले की, "19 तारखेला भाजपाला मतदान करा आणि त्यानंतर अयोध्येला या. फक्त अयोध्येला येण्यापूर्वी मला एकदा कल्पना द्या. त्यानंतर मी स्वत:हा सर्वांची सोय करेल", असं ते म्हणाले.
ज्यांनी रामाला आणलं त्यांना आम्ही आणू : पुढं ते म्हणाले की, "मी उत्तर प्रदेशच्या भूमीतून महाराष्ट्रात आलोय. मी श्री रामांच्या आयोध्येतून आलो असून मला एकच नारा ऐकू येतोय, ज्यांनी रामाला आणलं त्यांना आम्ही आणू." तसंच पूर्वी होळीचा सण साजरा करताना एक गाणं वाजवलं जायचं. 'अवध मे होली खेले रघुवीरा हमारा होली खेले रघुवीरा'. खरं तर पाचशे वर्षांअगोदर अयोध्येत श्रीरामांनी होळी खेळली नव्हती, पण यंदाची होळी रामानं धुमधडाक्यात साजरी केल्याचंही ते म्हणाले.
सबका साथ सबका विकास :"देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे. जनतेच्या भावनांचा आदर करणारं हे सरकार आहे. मी नागपुरात आलो तेव्हा नागपूरच्या पायाभूत सुविधा बघत होतो. अशाच पायाभूत सुविधा देशातही दिसत आहेत. हा बदल केवळ 10 वर्षांमध्येच झाला आहे. अनेकांच्या सत्ता आल्या पण त्यावेळी सुरक्षेची चर्चा झाली नाही. पायाभूत सुविधेवर चर्चा झाली नाही. मात्र, मोदी सरकार आल्यापासून विकास कामांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाहीये. देशात कल्याणकारी योजनांचा लाभ गोर-गरिबांना मिळत आहे. प्रत्येकाला कोणताही भेदभाव न करता सुरक्षा मिळत आहे. चेहरे पाहून नव्हे तर सर्वांना साथ देण्याच्या भावनेनं कामं केली जात आहेत", असंही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- शिवरायांना घडवण्यात जिजाऊ मातेचंच योगदान, काही लोक संभ्रम निर्माण करतात;पवारांकडून योगींच्या वक्तव्याचा समाचार
- महाराष्ट्रात येताना शिवचरित्राचा अभ्यास करूनच बोला, अमोल मिटकरी यांचा योगी आदित्यनाथ यांना सल्ला
- शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजामाताचं योगदान , काही लोक चुकीचं सांगतात; शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका