कोल्हापूरBJP National President :एकेकाळी भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी नाकारलेल्या आणि विरोधकांचं सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या विनोद तावडेंना (Vinod Tawde) आता राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात तावडे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. 2020 पासून केंद्रीय स्तरावर पक्षबांधणीसाठी झोकून काम करणाऱ्या तावडे यांचं मंत्रिपदही एकेकाळी काढून घेण्यात आलं होतं. देश पातळीवरील अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रभागी राहिलेल्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं बाळकडू अंगी असलेल्या तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कारकिर्दीची घडी पक्की बसवली आहे, याला मोदी आणि शाहांचं बळ मिळाल्यामुळं भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत विनोद तावडे सध्या जोमात आहेत. परिणामी केंद्रीय स्तरावर तावडे यांचं वजन वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
तावडे यांचं मंत्रिपद काढून घेतलं :राज्यात 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेनेचं युती सरकार आल्यानंतर मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवलेल्या विनोद तावडे यांना राज्याचं शिक्षण मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांची उमेदवारी डावलण्यात आली. मात्र पक्ष संघटनेत अन्याय होऊनही तावडेंनी राष्ट्रीय पातळीवर अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलल्या, 2020 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव पद मिळाल्यानंतर त्यांचा राज्याच्या राजकारणातील ओढा कमी झाला. बिहार सारख्या मोठ्या राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळताना लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तावडेंनी संघटना कौशल्याच्या बळावर नितीश कुमार यांच्यासारख्या नेत्याला भाजपासोबत आणण्यात यश मिळवलं. याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार करताना भाजपाला झाला, याचं खरं श्रेय तावडे यांनी केलेल्या नियोजनबद्ध राजकारणात पाहायला मिळतं.
ओम माथुर, सुनील बन्सल, के लक्ष्मण यांचीही नावं चर्चेत :भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 30 जून रोजी संपणार आहे. त्यांनाही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्यात टफ फाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात बन्सल यांनी शाह यांच्यासोबत सूक्ष्म नियोजनासाठी काम केलं तर पश्चिम बंगाल तेलंगाणा, ओडिशा राज्याचे प्रभारी असलेल्या बन्सल यांच्या नेतृत्वात भाजपाला चांगलं यश मिळालं. दुसरीकडं राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारसह हरियाणा, चंदिगडचे प्रभारी म्हणून लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. ओम माथुर आणि के बन्सल ही नावंसुद्धा डार्कहॉर्स आहेत. या कामगिरीच्या जोरावरच मेरिटनुसार पक्ष नेतृत्व कुणाला अध्यक्षपदाचा कौल देते हे पाहणं आवश्यक ठरणार आहे. वेगवेगळी नावं चर्चेत ठेऊन भलत्याच उमेदवाराला पुढे आणण्याची भाजपाची नीतीही विसरुन चालणार नाही.