नाशिक: 2014 च्या निवडणुकीत शिवसेनाकडून आमदारकीची उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते असा खळबळजनक आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. मात्र, तरी देखील मला उमेदवारी मिळाली नाही असही पांडे यांनी म्हटलं. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनायक पांडे बोलत होते.
नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. अडीच वर्षे झाली शिवसेनेत फूट पडून पण अजूनही त्याचे गोडवे गाण्यात सत्ताधारी शिंदे गटाला स्वारस्य वाटते. पद मिळवण्यासाठी मातोश्रीला मर्सिडिज द्यावी लागत होती असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी करून त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रान उठवलं. याचा समाचार घ्यायला संजय राऊत यांच्यासह अनेकांनी तोफा डागल्या. चारदा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हे यांनी किती मर्सिडिज दिल्या असेही ठाकरे गटातून म्हटलं गेलं. या पार्श्वभूमीवर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला.
प्रतिक्रिया देताना माजी महापौर विनायक पांडे (ETV Bharat Reporter)
काय म्हणाले पांडे : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मी शिवसेना पक्षाकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून मधून इच्छुक होतो. त्यावेळी अजय बोरस्ते स्पर्धेत होते. त्यावेळी भैया बाहेती यांच्या माध्यमातून मी नीलम गोऱ्हे पर्यंत पोहचलो. त्यांनी उमेदवारी मिळून देण्यासाठी माझ्याकडं पैशाची मागणी केली. मी देखील काही रक्कम त्यांना दिली. मात्र, तिकीट अजय बोरस्ते यांना जाहीर झालं. मग मी त्यांच्याकडं पैशाची मागणी केली. नीलम गोऱ्हे टाळाटाळ करत होत्या. अखेर मी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती सांगेल असं म्हटल्यानंतर त्यांनी मला काही रक्कम परत केली. मात्र, पूर्ण पैसे त्यांनी आजपर्यंत दिले नाहीत, असा आरोप विनायक पांडे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत एकही पैसा घेतला नाही :उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी आजपर्यंत मला भरभरून दिलं. मात्र, त्यांनी एक पैसा घेतला नाही. मी महापौर, उपमहापौर झालो मला कधीच काही द्यावं लागलं नाही. ठाकरे गटात कार्यकर्त्याना न्याय मिळतो. मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे. सगळं बघितलं आहे. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांचे काम करत नाही असा गंभीर आरोप, देखील पांडे यांनी गोऱ्हे यांच्यावर केला.
हेही वाचा -
- मुख्यमंत्र्यांचा साहित्यिकांना मोलाचा सल्ला, तर ओएसडी आणि पीएस नेमताना फिक्सरना कदापि नेमणार नाही, देवेंद्र फडणवीस बरसले
- शिवसेनेत पदासाठी पैसे द्यावे लागत नाहीत, अजय बोरस्ते यांचा नीलम गोऱ्हे यांना घरचा आहेर
- "साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार," संजय राऊतांचा हल्लाबोल