अकोला Amit Shah Visit Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागं विविध घडामोडी घडत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह यांनी अकोल्यात एक बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, "कार्यकर्ता भाजपाची संपत्ती असून, कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळं आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. आपण पक्ष विस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाईक म्हणून कार्यरत आहोत. या देशातील बूथ प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता होऊ शकतो. हे केवळ भारतीय जनता पक्ष करू शकते."
लोकसभा पूर्वतयारीची बैठक : अमित शाह हे अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपा संचालन समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक आणि लोकसभा पूर्वतयारीच्या बैठकीत बोलत होते. हॉटेल ग्रँड जलसा येथे त्यांचं आगमन झालं होतं. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर विराजमान होते.
भाजपा निवडणूक जिंकणारच : "भाजपा सकारात्मक पद्धतीनं निवडणूक लढणार आहे. जनतेच्या मनातला लोकनेता, जनतेला अभिप्रेत नेता प्राप्त झालाय. प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळं भाजपाचा हा विजयाचा मंत्र आणि आधार आहे. भाजपा 2024 ची निवडणूक जिंकणारच आहे. परंतु, 25 वर्षांचे लक्ष घेऊन भाजपाच्या चार पिढीनं केलेला संघर्ष, तपस्या, बलिदान याला नमन करून पक्ष विस्तारासाठी विपरीत परिस्थिती काम केलं. पक्षानं दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडा. लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम करा," असं शाह म्हणाले.