मुंबई Uddhav Thackeray News : काँग्रेस पक्षाकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी (25 एप्रिल) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज (26 एप्रिल) वर्षा गायकवाड यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संघातून निवडणूक लढणार असल्यानं आपण त्यांची भेट घेतल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? : भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवणं, हीच सध्या आमची भावना आहे. देशात हुकूमशाही येता कामा नये, राज्य घटनेचं रक्षण करायचं असून घटना बदलता कामा नये, त्याकरिता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढून जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असून त्या कोठूनही उभ्या राहिल्या तरी विजयी होतीलच. तसंच महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही, त्यामुळं त्यांच्या उमेदवाराचं आम्ही काही सांगू शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.