मुंबई Uddhav Thackeray :महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. यामुळं आघाडीतील तीनही पक्षाचा आणि मुख्यत: काँग्रेसचा चांगलाच आत्मविश्वास दुणावला आहे. असं असताना शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन दिवसीय दिल्ली दौरा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्याचे अनेक अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ काढले जात आहेत.
केशव उपाध्ये यांची टीका (Source - ETV Bharat Reporter) तीन दिवसांच्या दौऱ्यात काय झाले?उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दिल्लीत गेले तीन दिवस तळ ठोकून होते. तीन दिवसीय दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी अनेकांच्या दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सूत्राच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गेंसोबत विधानसभा निवडणुकीबाबत जागा वाटपाची चर्चाही केली. या बैठकीत मविआतील जागा वाटपाचा फॉर्म्युला कुणाला किती जागा द्यायच्या, यावर चर्चा करण्यात आली. 16 ऑगस्ट रोजी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवण्यात येणार आहे.
राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न ?लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितरित्या चांगलं यश मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचं नेतृत्व काँग्रेस करेल, असा राजकीय विश्लेषकांकडून कयास लावला जात आहे. राज्यात ही परिस्थिती असताना उद्धव ठाकरेंनी तीन दिवस दौरा करून एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं देखील बोललं जात आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपलं राजकीय वजन वाढवण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तीन दिवस हुजरेगिरी :उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा लवकरच जाहीर करू, असे सांगितलं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे स्पष्ट सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली. " तीन दिवस दिल्लीत केवळ हुजरेगिरी करून मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या स्वप्नावर पाणीच फेरले आहे. जे बाळासाहेब कोणासमोर झुकले नाहीत. त्यांचे पुत्र सर्वांसमोर जाऊन झुकत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीला गेले होते, " असा निशाणा केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर साधला.
आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत : "उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवस दिल्ली दौऱ्याचं फलित काय? याचा विचार केला तर महाविकास आघाडी मधील आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं म्हणता येईल. महाविकास आघाडीत अतिशय खेळीमेळीचं, प्रेमाचं वातावरण आहे. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत. आमचं सुरळीत सुरू आहे," असे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंची भीती :मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी तीन दिवस दिल्ली दौरा केला, अशी टीका भाजपानं केली आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले की, "भाजपा हा मोठा पक्ष आहे. परंतु ते आता अगदी बालिशपणाचं वक्तव्य करू लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाचे सुरळीत सुरू आहे. जागावाटप किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हे काय जगजाहीर करून बोलायच्या गोष्टी आहेत का? सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते हे दिल्लीत असतात. दिल्ली ही राजकारणाचं केंद्रस्थान आहे. मग दिल्लीत जाऊन चर्चा केली तर यात चुकलं कुठे?" असे ईटीव्ही भारतशी बोलताना सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे. "आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहोत. जागावाटप किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवारांबाबत चर्चा करणं यात काही चुकीचं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते भीतीपोटी उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत," असा पलटवार आमदार सुनील शिंदे यांनी केला.
हेही वाचा
- वक्फ विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंच्या खासदारांचा संसदेतून काढता पाय? राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू - Waqf Amendment Bill
- लोकशाहीच्या मार्गानं महायुती सरकार घालवणार - संजय राऊत - Sanjay Raut On MVA
- महायुतीचा निवडणुकीसाठी प्लॅन ठरला? सुरू आहेत बैठकांवर बैठका - Maharashtra Assembly Election