मुंबई Mahayuti Meeting Delhi Cancel: महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसताना या संदर्भात आज दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होती. परंतु दिल्लीत होणारी ही बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आलीय. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तशा पद्धतीच्या सूचना राज्यातील महायुतीच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. या कारणास्तव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं टेन्शन अधिक वाढलं आहे.
जागा वाटपाचा तिढा सुटेल का? : मागील अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. दोन-चार जागांवर मतभेद आहेत, पण तेही लवकरच सोडवले जातील असं वारंवार महायुतीच्या तिन्ही पक्ष्यांचे प्रमुख नेते सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, ते स्वतः, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट करून जागा वाटपाचा तिढा आज सोडवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी सांगितलं होतं. परंतु महायुतीच्या या नेत्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत असलेली आजची बैठक रद्द करण्यात आली असल्यानं, यामागे नक्की काय कारण असू शकतं? यावर चर्चा सुरू झाली आहे.
जागा वाटपाचा तिढा सुटेल का? : विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते जरी या बैठकीला गेले नसले तरीसुद्धा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची जागा वाटपा संदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याऐवजी अगोदर भाजपाच्या राज्यातील नेत्यांशी पुन्हा विचार विनिमय केला जाणार असल्यानं नक्की हा जागा वाटपाचा तिढा सुटेल का? की हा तिढा अद्याप कायम राहील? हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय.
आमच्यामध्ये फार काही ताणतणाव नाही: या आजच्या बैठकीबद्दल बोलताना दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, महायुतीमध्ये आतापर्यंत ८० टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. तर फक्त २० टक्के जागांवर चर्चा होणार असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये तो निर्णय अंतिम होईल. आमच्यामध्ये फार काही ताणतणाव नाही. अनेक जागांबाबत आमचं एकमत झालं असून विरोधक विनाकारण याबाबत राजकारण करत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.