महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण...; भास्कर जाधवांचं भावनिक पत्र, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? - भास्कर जाधव उद्धव ठाकरे

Bhaskar Jadhav Emotional letter : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केलंय. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय.

Bhaskar Jadhav
भास्कर जाधव

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 7:07 PM IST

मुंबईBhaskar Jadhav Emotional letter : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण (Maharashtra Politics) तापण्यास सुरुवात झालीय. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेस सुरू आहे. तर दुसरीकडं ठाकरे गटाची गळती थांबायला तयार नाही. कोकणातील ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं, ते पक्षात नाराज असल्याचं बोललं जातय. भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार का? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय.


माझ्यासोबत विश्वास घातकी राजकारण : कोकणातील महत्त्वाचा चेहरा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एक आक्रमक नेता म्हणून भास्कर जाधव यांची ओळख आहे. सडेतोड बोलणं ही त्यांची स्टाईल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मौन धारण केल्यामुळं अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. भाजपा नेते नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादाची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली गेली नसल्यामुळं, भास्कर जाधव नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या आणि अनेक गोष्टींसंदर्भात खंत कार्यकर्त्यांना पाठवलेल्या संदेशात व्यक्त केलीय. माझ्यासोबत विश्वासघातकीपणाचं राजकारण झाल्याचं संदेशात नमूद करण्यात आलंय.



काय लिहिलं पत्रात :"मला तुमच्याशी, काही बोलायचं आहे. आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र!!", अशा प्रकारचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय सामाजिक कारकीर्दीचं सिंहावलोकन करत असताना, 1985 पासून मला साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदार संघातील आणि 2007 पासून गुहागर मतदार संघातील साथ देणाऱ्यांचं ऋण व्यक्त करायचं आहे. कार्यकर्ते असा उल्लेख नेते करत असतात, मात्र मी कायमच सहकारी म्हणून उल्लेख करतो. तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे पाठीशी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना वाढविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.

पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न : 42 वर्ष राजकीय प्रवासात यशाची एक-एक शिखरे पादाक्रांत करण्याचा मान रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधवला मिळालाय. आज बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला किंवा संकटांना न घाबरता उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टी करत असताना माझ्यावर, घरावर आणि कार्यालयावर हल्ले करून मला संपवायची भाषा एका अधिकृत राष्ट्रीय पक्षाच्या व्यासपीठावरून केली जात आहे. अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसंच नवीन आणि ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो. आजही अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजं, ही ऊर्जा मिळते.


विश्वासघातकी राजकारण: माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या सर्व विषयांना मला आपल्या सोबत बोलायचं आहे. पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलानं आकाशात फडकवायचा आहे. रविवारी (10 मार्च) सकाळी11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया, मी आपली वाट पाहतोय. अशा प्रकारचं भावनिक आवाहन भास्कर जाधव यांनी संदेशात केलंय. त्यामुळं यावर राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.


भास्कर जाधव भाजपात जाणार का : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भास्कर जाधव भाजपात जाणार का? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडं कायमच आपल्या वक्तृत्व शैलीमुळं विरोधक असो किंवा राज्यातील जनता यांना भास्कर जाधव यांनी कायमच आपल्या शैलीतून वेगळेपण निर्माण करण्याचं काम केलंय. आता या पोस्टच्या माध्यमातून भास्कर जाधव यांनी भावनिक कार्ड खेळलंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार भास्कर जाधव नाराज असून ते उद्या चिपळूणमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत. यावर उद्याचं उद्या पाहू असं म्हणत संजय राऊत यांनी याविषयी बोलणं टाळलं आहे.

हेही वाचा -

  1. 'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला
  2. "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते, पण..."; आमदार योगेश कदमांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
  3. "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details