पुणे Supriya Sule On Vijay Shivtare : उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसंच यावेळी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही शिवतारेंनी जाहीर केलं. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : पुणे महानगरपालिकेच्या जाचक टॅक्सचा निषेध करण्यासाठी शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागातील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल मोर्चाचं (आहिरागेट ते शिवणे वॉर्ड ऑफीस) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, लोकशाही आहे, आणि त्यामुळं सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पुढं त्या म्हणाल्या की, आज देशात पेटीएम घोटाळा, इलेक्ट्रॉल बाँड घोटाळा होतोय. दुसरीकडे मी नाही तर भाजपानं अशोक चव्हाणांवर आरोप केले होते. आज आदर्श घोटाळा कुठंय? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला.