चंद्रपूर Sudhir Mungantiwar On Shivani Wadettiwar : चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय इंडस्ट्रियल एक्स्पो महोत्सवाचे उद्घाटन आज (4 मार्च) करण्यात आले. या एक्स्पोच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उद्योग, कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात असून, यावर युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तसंच विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी टीका केली. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा फसव्या कार्यक्रमांचं आयोजन करणे हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं त्या म्हणाल्या. तर 'विकासाची अशी थट्टा करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो' या शब्दांत मुनगंटीवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय.
शिवानी वडेट्टीवार यांची टीका : या मेळाव्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, "ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. जिल्ह्यात आधीच इतके उद्योग आहेत. यासाठी बाहेरुन येणाऱ्यांना रोजगार मिळतो. मात्र, स्थानिक युवक यापासून वंचित आहेत. या मेळाव्याचा उद्देश हा स्थानिकांना रोजगार देण्याचा नसून निव्वळ आपली प्रसिद्धी करण्याचा आहे. नाही तर आधीच सुरू असलेल्या उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला असता. त्यातही उद्योग येतात अशी दवंडी पिटवली जाते. मात्र, हे उद्योग गुजरात राज्यात पळवले जातात. चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं येथे कोणते प्रकल्प आणले जाणार आहेत याचाही विचार व्हायला हवा."
ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो : शिवानी वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुनगंटीवार म्हणाले की, "ज्यांच्या पोटात दुखतंंय, त्यावर इलाज नाही. जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा काहीच केलं नाही आणि दुसरे करत असेल तर त्यांना हे बघवत नाही. पक्षाचा कुठलाही भेदाभेद न ठेवता आपण विकासाकडं बघितलं पाहिजे. बेरोजगारांची अशा पध्दतीनं थट्टा करणं, विकासाची अशी टिंगल करणे यावर 'ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो' असंच म्हणावं लागेल."