अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. तर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाचा माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत, निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळं भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. त्याही निवडणूक लढण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे हा पेच सोडविण्यासाठी राज्य आणि केंद्रस्तरावरून हालचाली सुरू होत्या.
अमित शाह यांची घेतली दिल्लीत भेट :भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यानंतर मुंबई येथे स्नेहलता कोल्हे आणि पुत्र विवेक कोल्हे यांच्यात दोनदा बैठक पार पडली. फडणवीस यांनी कोल्हे यांच्या पक्षकार्याबाबतचा सकारात्मक अहवाल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना पाठवला. त्यानंतर भूपेंद्र यादव आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. आज स्नेहलता कोल्हे आणि पुत्र विवेक कोल्हे तसंच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. पक्ष, कोल्हे कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान राखेल असं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर कोल्हे कुटुंबीयांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.