मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्या प्रकरणी काल पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची व शिवप्रेमींची माफी मागितली. परंतु ही माफी मागितल्यानंतर त्यांनी वीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. "ज्यांनी वीर सावरकरांचा वारंवार अपमान केला, ते अजून माफी मागत नाहीत," असं पीएस मोदी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांच्या माफी नाम्यावरून आता राजकारण तापलं असून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांनी अटी शर्तीवर माफी मागितली आहे, असा विरोधकांनी केला.
राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी केलेला आक्रोश पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुतळा कोसळल्याबद्दल माफी मागितली. शिवप्रेमी आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जात, मुख्यमंत्री म्हणाले की, "गरज पडल्यास शिवरायांची शंभर वेळा माफी मागण्यास तयार आहे. विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे आहेत. पण त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावं."
शिव्या देऊन अपमानित करत असतात : राज्यातील या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात बंदराच्या भूमिपूजन समारंभात आपण डोकं टेकवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्याचं सांगितलं. त्यांनी शिवभक्तांचीही माफी मागितली. पण नंतर बोलताना ते म्हणाले की, "भारत मातेचे आणि महाराष्ट्राचे महान सुपुत्र वीर सावरकरांचा प्रत्येक वेळी अपमान करणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करणारे माफी मागण्यास तयार नाहीत. उलट न्यायालयात जाऊन लढाई लढण्याची त्यांची तयारी आहे. महाराष्ट्रातील जनतेने अशा लोकांचे संस्कार जाणून घ्यावेत, आमचे संस्कार वेगळे आहेत." असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करायला हवी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्या बरोबर वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केल्यानं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली आहे. त्यांनी मधेच सावरकरांना आणलं. पंतप्रधानांच्या अशा वागण्यानं ते शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना तर करत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतोय. पंतप्रधान आणि भाजपाला महाराजांच्या पुतळ्याचा फक्त इव्हेंट करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, अस्मिता आहेत. नुसती माफी मागून चालणार नाही. घडलेल्या घटनेमुळे मराठी माणूस संतप्त आहे. पंतप्रधानांनी माफी मागून काही फायदा होणार नाही. त्यांनी झालेल्या घटनेसंदर्भात जबाबदारी निश्चित केली पाहिजे."