छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackeray :विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रविवारी (7 जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी पक्षाचे दिग्गज नेते हजर होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार प्रहार केला. तसंच राज्य सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.
भाजपा नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश :"राज्यात सुरु असलेल्या घोषणा निवडणुकीला समोर ठेवून आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र होणार नाही," अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. "महिलांना योजना लागू करुन मत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक होती. मात्र, महाराष्ट्राची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक असून जास्तीत जास्त जागा आपण जिंकू," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. "समाजा समाजात फूट पाडू नका, तुम्हाला जर तोडगा काढायचा असेल तर मंत्र्यांना नाही तर थेट जरांगे आणि हाके यांना एकत्र बसवा आम्ही पाठिंबा देऊ," असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या मेळाव्यात भाजपा नगरसेवक तथा माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी इतर चार नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.
सरकारचं शेवटचं अधिवेशन :"अधिवेशनाला सुरुवात झाली. हे या सरकारचं अखेरचं निरोपाचं अधिबेशन आहे. आता आपण यांना घालवायची शपथ घ्यायला हवी. माता भगिनींच्या मतांसाठी डाव टाकून योजना जाहीर करणे सुरु आहे," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी 'लाडकी बहीण' योजनेवरुन सरकारवर केला. "10 वर्षात इतक्या योजना जाहीर केल्या. अंमलबजावणी कधी केली? शेतकऱ्यांचे पूर्ण वीज बिल माफ करा, थकबाकी सकट वीज बिल माफ करा. यांचा पापाचा घडा भरला आहे, म्हणून हे योजना जाहीर करताय. नुसत्या थापा मारतात, महिलांसाठी योजना आणता आहेत, स्वागत आहे. मात्र, माझ्या युवकांसाठी काय आहे? बेरोजगारांचे तांडे फिरतात, निवडणूक आल्या की भुलवायचं आणि झाल्या की येरे माझा मागल्या असं म्हणायचं, "अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.