मुंबई Sanjay Shirsat : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडणार आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या प्रचारात सत्ताधारी-विरोधक हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना 2019 पूर्वी मुख्यमंत्री करण्यास भाजपाचा विरोध होता. तर मविआमध्ये अजित पवार गटाचा विरोध होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपा किंवा अजित पवार गटाकडून कोणताही विरोध नसल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
अडीच-अडीच वर्ष भाजपाला मान्य : दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेस सरकार स्थापन करण्यासाठी भाजपासोबत बोलणी सुरु होती. तेव्हा अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री ही अट भाजपाला मान्य होती. परंतु हे उद्धव ठाकरेंना मान्य नव्हतं. कारण आपण वेगळा निर्णय घेतला तर पाच वर्ष आपला मुख्यमंत्री असेल. तेव्हा वारंवार एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सांगत होते की, आपण भाजपाची ऑफर मान्य केली पाहिजे. परंतु उद्धव ठाकरे यांनी याला विरोध केला आणि तुम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करा असं सांगितलं. तेव्हाही म्हणजे 2019 पूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचंच नाव समोर आलं होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता, असा गौप्यस्फोट शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ता संजय शिरसाठ यांनी केलाय.