मुंबई Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde :शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शिवसेनेचा यंदाचा स्थापना दिन सोहळा महत्त्वाचा आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही गटांनी यावेळी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. आजच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जात असून, वरळी येथील डोम बाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तर सायन येथील क्षणमुखानंद सभागृहाबाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याचं दिसून येत आहे. हे दोन्ही नेते यावेळी नेमकं काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही गटांकडून कार्यक्रमांचं आयोजन :2022 मध्ये 40 आमदार आणि 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आज वरळी डोम येथे सायंकाळी 5 वाजता साजरा होणार आहे. वरळी येथे आज सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटाचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली असून, या कार्यक्रमाला सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्थापना दिनाचा कार्यक्रम शिव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 7 वाजता होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय, सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.