महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार"; ठाकरेंची शिवसेना आक्रमक - SUSHMA ANDHARE ON NEELAM GORHE

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना (उबाठा) पक्ष आक्रमक झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Neelam Gore Uddhav Thackeray
नीलम गोरे उद्धव ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 5:05 PM IST

पुणे :शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की मोठं पद मिळायचं, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाच्या विरोधात शिवसेना (उबाठा) पक्ष आक्रमक झालाय. शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून गोऱ्हे यांच्या विरोधात आता अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली.

लवकरच दावा दाखल करणार: याबाबत आमची कायदेशीर टीम काम करत आहे. नीलम गोऱ्हे यांच्यावर किती रुपयांचा दावा दाखल करता येईल हे ठरविण्यात येत असून, लवकरच दावा दाखल करण्यात येणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे (ETV Bharat Reporter)

निष्ठावंतांची संधी हिसकावून घेतली: "नीलम गोऱ्हे यांनी कामाची सुरुवात 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया'मधून केली. त्यानंतर त्यांनी भारिप बहुजन महासंघात उडी मारली आणि तिथं त्यांना एक ओळख मिळाली. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना ओळख दिली. इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोषमध्ये नसल्यानं त्यांनी आंबेडकरांशी देखील बेईमानी केली आणि नंतरच्या काळात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. पवारांनी दिलेल्या संधीची जाणीव न ठेवता तिथं देखील बेईमानी केली आणि मग त्या आमच्या पक्षात आल्या आणि आमच्या पक्षात त्यांनी कित्येक निष्ठावंतांची संधी हिसकावून घेतली," असं म्हणत सुषमा अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केला.

दोन मर्सिडीज कुठून आणल्या?: "पक्षानं चारवेळा आमदारकी दिली त्या गोऱ्हे यांनी शहरात सोडा पण त्या जिथं राहतात तिथं शिवसेनेची शाखा देखील सुरू केली नाही. तसंच मी २०१७ मध्ये त्यांना शिवसेनेत पक्ष प्रवेशाबाबत बोलले असताना २०२२ पर्यंत माझा पक्ष प्रवेश होऊ दिला नाही. पहिल्या आमदारकीला त्यांनी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांचा असा कोणता व्यवसाय आहे की त्यांची प्रॉपर्टी एवढी वाढली?" असे सवाल अंधारे यांनी विचारले.

हेही वाचा -

  1. वाघाची शिकार करताना उंदीर तरी हाती लागला का? सुषमा अंधारेंची 'ऑपरेशन टायगर'वर टीका
  2. शंभूराज देसाईंचा सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा, काय आहे प्रकरण?
  3. "शपथविधी जनमताने नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादानं"; सुषमा अंधारेंची जोरदार टीका

ABOUT THE AUTHOR

...view details