पुणे Shirur Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी चालू आहे. यासाठी सर्वच दिग्गज नेते शिरूरचा दौरा करत आहेत. सध्या ही जागा मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. भाजपा-शिंदेच्या शिवसेनेशी घरोबा केलेल्या अजित पवार गटानं महायुतीतून या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा सांगितला आहे. तसेच भाजपा उमेदवारदेखील ‘शिरूर लोकसभा ’ लढण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे.
नेमका उमेदवार कोण ? राज्यातील प्रमुख लढतींपैकी महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातंय. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे हे आपला उमेदवार उतरविणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच भर म्हणजे भाजपादेखील या लोकसभेच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) आणि महाआघाडी (शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस) यांच्यामधून नेमका उमेदवार कोण असणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवसेना एकनाथ शिंदेच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : गेल्या वर्षभरात राज्यात सत्तेत झालेल्या परिवर्तनामुळं राज्यातल्या राजकारणात मोठे बदल झाला. तसेच आगामी निवडणुकीत अनेक बदल होणार आहेत. शिरूर लोकसभा उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांच्यावर म्हाडाच्या अध्यक्ष पदाचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र यानंतरही शिवाजी आढळराव पाटील हे लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे 15 वर्ष या मतदार संघाचे खासदार राहिले आहेत. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र, 2024 लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजी आढळराव पुन्हा उतरणार असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. अशातच शिरूर लोकसभा क्षेत्रात शरद पवार आणि अजित पवार गटाचे दौरे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : दुसरीकडं खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. मूळचे शिवसेनेचे अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्याच उमेदवाराचा पराभव करत संसद भवन गाठलं. आता परत खासदार अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभेसाठी रिंगणात उतरणार आहेत. मात्र 2024 ची लोकसभा ही अमोल कोल्हे यांच्यासाठी कठीण असणार आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) उमेदवार रिंगणार उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यातच अनेकदा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचंही म्हटलं आहे. अमोल कोल्हे हे एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, अजित पवार गट आणि भाजपा या तिन्ही डगरीवर पाय ठेऊन आहेत.
राष्ट्रवादी अजित पवारच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर: शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडं गेला तर त्या गटाकडं सहकारमंत्री दिलीप वळसे आणि आमदार दिलीप मोहिते हे दोन उमेदवार आहेत. या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. दुसरीकडं पार्थ पवार यांना शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी शिरूर मतदार संघात अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. पार्थ यांच्या प्रचारासाठीच सुनेत्रा पवार या शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचं बोललं जातय.
भाजपाच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर: भाजपाच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. लांडगे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे लढले तर आढळराव अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. खासदार अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार महेश लांडगे अशी दुरंगी लढत झाली तर ती चांगलीच अटीतटीची निवडणूक होऊ शकते.