कोल्हापूर Sharad Pawar on Narendra Modi : कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं स्मारक उभारण्यात आलं असून, या स्मारकाचा उद्घाटन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी शरद पवारांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय.
पानसरेंच्या स्मारकाचं लोकार्पण : नऊ वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेला मंगळवारी नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकरी मोकाट फिरत असून तपास यंत्रणांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलंय. मात्र, नऊ वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी गोविंद पानसरे यांच्या सार्वजिक कार्याचं भान ठेवून त्यांच्या हत्येनंतर झालेल्या शोकसभेत त्यांचं स्मारक उभं करण्यात पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महापालिकेनं या स्मारकासाठी 35 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. तर कमी पडणारा 25 लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करुन दिला. यातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं स्मारक उभारण्यात आलं असून त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसंच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी या सोहळ्यास भाकपचे जनरल सेक्रेटरी खासदार डी. राजा, राज्याचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र कानगो, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, मेघा पानसरे उपस्थित होते.
पुरोगामी विचार संपणार नाही : पानसरेंच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर खासदार शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, "हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून पानसरे, दाभोळकर यांच्यावर हल्ला करत पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र, विचाराची संघर्ष करायचा असेल तर विचारानं करायला हवा. मात्र, ज्यांच्याकडे विचार नाही ते अशा प्रवृत्तीनं कायदा हातात घेऊन असा भ्याड हल्ला करू शकतात हे त्याचं उदाहरण आहे. आज प्रतिगामी शक्ती या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना पुरोगामी विचारांची किंचितसुद्धा आस्था नाही."