कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उबाठाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना "जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही, तर आश्चर्य व्यक्त होतं. त्याचप्रमाणं माझं झालंय. वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळं आता मी धक्कापुरुष झालोय. आता कोण किती धक्के देतंय ते बघूया," असं वक्तव्य शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना मोलाचा सल्ला दिलाय.
नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? :यासंदर्भात कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शंभूराज देसाई म्हणाले की, "माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज रोज धक्के बसत असतील तर त्याचं कारण शोधलं पाहिजे. भूकंपाचा केंद्रबिंदू तपासला पाहिजे. कोणत्या मूळ ठिकाणापासून हे भूकंप होत आहेत ते त्यांनी शोधावं. आम्ही 2019 पासून त्यांना हेच सांगतोय, त्यांनी ऐकलं नाही आणि त्याचे असे परिणाम झालेत. त्यामुळं आता भूकंपाचा केंद्रबिंदू शोधला की त्याच्यावरचा उपाय करता येईल. ज्यांना धक्का बसतोय त्यांनी अंडर करंट शोधला पाहिजे, शोधा म्हणजे सापडेल," असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.
रायगडच्या पायथ्याशी 'शिवसृष्टी' : पुढं त्यांनी सांगितलं की, "राज्याचा पर्यटन विभाग दोन महिने झाले माझ्याकडं आलाय. जुने पर्यटनाचे प्रकल्प हातात घेतले असून ते प्राधान्यानं पूर्ण करण्याचं ठरवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिथं संधी आहे, तिथं प्रकल्प हाती घेण्याचं सांगितलंय. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी 'शिवसृष्टी' साकारण्याचं पहिल्या टप्प्यातील काम हाती घेतलंय. तर प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला, ते ठिकाणही विकसित करणार आहोत." तसंच कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळा आणि दख्खनचा राजा ज्योतिबा ही ठिकाणं विकसित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून प्राधान्यानं हे ठिकाण पर्यटनासाठी विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.