कोल्हापूर Shahu Maharaj PC : "गेल्या साठ वर्षात कधी नव्हे, तो महाराष्ट्र आज अस्थिर आहे. यापूर्वी कधी राजकारणात नव्हतो. आता जनतेला माझ्या राजकारणात असण्याची गरज वाटत आहे. काँग्रेसनं देशातील विकासाचा पाया घातला. लोकांचं संरक्षण करणं आणि समतेचा जागर तेवत ठेवणं गरजेचं आहे. या माध्यमातून विकास साधणं हाच शिवछत्रपतींचा हिंदुत्ववाद आहे.
महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या लोकसभेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज कोल्हापुरातील नवीन राजवाडा इथं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराजांचं समतेचं कार्य आपण पाहतोय. हाच विचार जनतेमध्ये आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. तोच विचार पुढं घेऊन जाणार आहे.
मोदींनी काम केलंय पण समाजाला दिशा दिली पाहिजे : "पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंनी अगदी मनापासून पाठिंबा दिलाय. राज्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकमुखानं लोकसभेच्या उमेदवारीसाठी निवडलं. असा मी एकमेव उमेदवार आहे. काँग्रेस हा जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पक्षानं काम केलंय. देशाचा पाया काँग्रेसनं घातला. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामं केलंय. त्यांचं काम कमी लेखून चालणार नाही. पण समाजाला दिशा दिली पाहिजे. भविष्यात राज्याचं राजकारण योग्य दिशेनं न्यायचं असेल महाविकास आघाडीला नेतृत्व देणं गरजेचं आहे. कोल्हापूर हे नेतृत्व देईल, असा विश्वास शाहू महाराजांनी यावेळी व्यक्त केला. देशासह राज्यातील राजकीय अस्थिरता म्हणजे पक्षांतर बंदी कायदा अपयशी ठरला आहे. एकतर हा कायदा रद्द करावा अथवा मजबुत करावा, असं परखड मत कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलंय.
देश एकाधिकारशाहीकडे झुकत आहे :पुढे शाहू महाराज म्हणाले," देशभरात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधक संपवण्याचं काम सध्या देशभरात सुरू आहे. त्यामुळंच देश एखाधिकारशाहीकडे झुकत आहे. देशात लोकशाही टिकली पाहिजे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ होईल असंही शाहू महाराज म्हणाले. मात्र, शाहू महाराजांनी भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर बोलणं टाळलं.
हेही वाचा :
- महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List