प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर Sanjay Shirsat On Sanjay Raut: अयोध्येचा सोहळा म्हणजे निवडणुकीची तयारी असल्याची टीका विरोधक करत असताना, त्यांना शिंदे गट शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. हो ही तयारी समजा, तुमचं का पोट दुखतंय. जो झाड लावेल तो फळं खाईल, राम मंदिर तुम्ही उभं केलं का? तुम्ही प्रयत्न केले का? आज राम मंदिर उभं झालं असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ज्यानं काम केलं त्याला त्याचा फायदा होणार असेल तर त्यात गैर काय. तुम्ही जे काम केलं नाही त्याचं श्रेय घेता का. यांनी मराठी माणसांसाठी काही केलं नाही आणि आज भांडत आहेत. जो करेल त्याला फळ मिळेल. निवडणुकीत रामाचा वापर होणार आहे आणि आम्ही तो करू असंही ठामपणे संजय शिरसाट यांनी सांगितलं.
आम्ही लवकरच जाणार : अयोध्येत प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. सर्वांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहेत. तसंच फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिकमध्ये आरती करत आहेत. स्वतःला विद्वान समजणारे रामावर प्रश्न विचारत आहेत. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार आहे. बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं पण आम्ही यांना का महत्व द्यायचं हा इव्हेंट नाही, हा आनंदोत्सव आहे. आज गर्दी आहे, त्यामुळं जाता आलं नाही. पण लवकरच आम्ही सर्वजण दर्शनाला जाणार आहोत, अस संजय शिरसाट यांनी सांगितलंय.
यांनी बाळासाहेबांना विकलं असतं: पक्ष घेऊन चोर पळाले अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, मुंबईत पाणी शिरलं तेव्हा हे पळाले बाळासाहेबांना एकटं सोडलं. बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. त्यांना अभिप्रेत असलेला पक्ष आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी उठाव केला. हे दलाल आहेत यांनी पक्ष विकला आणि यांनी साहेबांना विकायला पण कमी केलं नसतं. हे काँग्रेसमध्ये विलीन झाले तर आश्चर्य वाटायला नको. यांना आता जाणीव झाली आहे की, आपण पक्ष चालवू शकत नाही. आपण पक्ष विकातोय, जर आता पाहिले तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत. संजय राऊत हे गांधींवर लक्ष ठेऊन आहेत. पाहिले शरद पवार आता राहुल गांधी यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. आता हे सर्वांचे प्रवक्ते बनले आहेत अशी टीका, संजय राऊत यांच्यावर केली.
टिकणारे आरक्षण देऊ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत, त्यांचं मुंबईतही स्वागत होईल. त्यांना जनतेचा पाठिंबा आहे. पण 2 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आरक्षण देऊ आणि त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. त्यांच्यासोबत लहान, वृद्ध आहेत त्यांची काळजी घ्यावी. आरक्षण मिळणारच ही भूमिका ठाम आहे. आज आरक्षण दिलं तर लोक न्यायालयात जातील म्हणून आम्ही कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण देणार आहोत. त्यामुळं वेळ लागत आहे, पण टिकणारे आरक्षण देऊ असं आश्वासन, संजय शिरसाट यांनी आंदोलकांना दिलं आहे.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीचे वाजू लागले पडघम, शिवसेना शिंदे गटाचं ६ जानेवारीपासून शिवसंकल्प अभियान
- वाळूज दुर्घटना प्रकरणी कंपनी मालकावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, लोकप्रतिनिधींची मागणी
- जयंत पाटलांमुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, आमदार संजय शिरसाट यांचा दावा