मुंबई Sanjay Raut slams Modi Government : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बिहारला नैसर्गिक आपत्तीसाठी 18 हजार कोटी देण्यात आलेत. यावरुन शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार तसंच राज्य सरकारला फटकारलंय. तसंच महाराष्ट्राला किमान 1000 कोटी रुपये द्या, अशी त्यांनी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचं काम फक्त क्लिप बनवणं इतकंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
महाराष्ट्राला 1000 कोटी तरी द्या? : माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, "केंद्रीय बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी देण्यात आले. महाराष्ट्रातील पूर त्यांना दिसत नाही का? बिहारला इतके पैसे का दिले? याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विचारणा करावी. मात्र, हे विचारण्याची हिंमत त्यांच्यात नाही. महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी एक दमडीसुद्धा दिलेली नाही. यावर जे बजेट बघायला पेन, पेन्सिल घेऊन बसले होते, त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बिहारला दिलेल्या पैशाबद्दल सांगावं."
अनेकदा सत्याला पुरावा नसतो : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला . यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच यासंदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "चार-पाच महिन्यांपूर्वी स्वतः अनिल देशमुख यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय. ईडीमधून नाव काढून घ्यायचं असेल तर आम्ही सांगू ते ऐकावं लागेल, असं भाजपाच्या अनेक नेत्यांनी सांगितलंय. मलाही असं सांगण्यात आलं होतं. अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल भाजपात का गेले? शिदेंचे नेते भाजपासोबत का गेले? याचं उत्तर एकच ते म्हणजे ईडीची भीती आहे. मी तुरुंगात होतो, तेव्हा कधीतरी मला अनिल देशमुख भेटायचे. तेव्हा त्यांनी मला हे सगळं सांगितलं. परंतु अनेकदा सत्याला पुरावा नसतो. त्यामुळे सत्य पराभूत होतं.", असं राऊत म्हणाले.
क्लिप तयार करणं गृहमंत्र्यांना शोभतं का? : अनिल देशमुख यांच्या संदर्भात माझ्याकडं पुरावे आहेत. त्या संदर्भातील क्लिप आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणालेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, " भाजपानं आयुष्यभर दुसऱ्यांचे क्लिप बनवण्यातच धन्यता मानली. त्यांचा क्लिपचा कारखाना असून तेच त्यांच्या राजकारणाचं सूत्र आहे. विरोधी पक्षांचे फोन टॅपिंग करणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस राज्याचे पोलीस महासंचालक बनवतात. त्यामुळं त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्याचं कोणी अधोपतन केलं असंल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. गृहमंत्री अभिमानानं सांगतात, मी माणसं फोडली. क्लिप तयार केल्या आहेत. हे त्यांना शोभतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे देवेंद्र फडवणीससुद्धा अनैसर्गिकरित्या वरून पडलेत. केंद्रात नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्यात देवेंद्र फडणवीस आल्यापासून अशा पद्धतीचं घाणेरडं गटारी राजकारण सुरू झालंय," अशी जहरी टीका राऊतांनी केली.
हेही वाचा -
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024; सरकारला पाठिंबा दिल्याचा गिफ्ट; अर्थसंकल्पातून बिहारला मोठं गिफ्ट, रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींचा निधी - Union Budget 2024
- "केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं?"; अर्थसंकल्पावरुन विरोधकांची सरकारवर टीका - Union Budget 2024
- "अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस, मात्र...."; अर्थसंकल्पावर काय म्हणाले प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट बकुल मोदी? - Union Budget 2024