मुंबई Sanjay Raut On PM Narendra Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायांचं दर्शन घेतलं आणि आरती केली. यावरूनच आता उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले, यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. सरन्यायाधीशाच्या पदावर चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असताना देखील तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातंय असं स्वत: सरन्यायाधीश वारंवार म्हणताता, पण निर्णय होत नाही. आता ते निवृत्तीला आले असताना त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचतात यावरून काय बोध घ्यावा? असंही राऊत म्हणालेत.
पंतप्रधान मोदी संविधानाला धरून आहेत का? : पुढं राऊत म्हणाले की, "खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली तर जात नाही ना? या लोकांच्या मनातील शंका नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनं पक्क्या झाल्या आहेत. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला तसंच प्रोटोकॉलला धरून आहेत का? आतापर्यंत मोदी गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले याची माहिती माझ्याकडं नाही. परंतु, ज्या पद्धतीनं काल पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले. त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आरती केली. हे पाहता धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान असं चित्र पाहायला मिळालं", असा टोला देखील राऊतांनी लगावलाय.
तारखांवर तारखा का देताय? : "पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश असताना महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्याबाबत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? या प्रकरणाबाबत तारखांवर तारखा का देताय? याबाबत शंका आमच्या आणि जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप, परंतु महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणात अवाक्षर काढलं जात नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख. हे सर्व का होतंय?", असा सवाल राऊतांनी केला.