पुणे Lok Sabha election 2024: खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली. बारामतीची लढाई ही फक्त शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नसून "महाराष्ट्राच्या अस्मितेची" लढाई आहे. उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारला : खासदार संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी स्वतः औरंगजेब आहेत. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. म्हणून याला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म हा गुजरातला झालाय. मोदी यांच्या गावातील शेजारचं गाव आहे. तिथं औरंगजेब याचा जन्म झाला. त्यामुळे मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. म्हणून ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहे," अशी बोचरी टीका राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.
मोदी यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे: पुरंदर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत खासदार राऊत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, गेल्या एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात 27 वेळा आले. रोज मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रात आहेत. ते मुंबईमध्ये 8 सभा घेणार आहेत. देश वाऱ्यावर सोडून ते महाराष्ट्रात येत आहेत. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या देशातील पंतप्रधान हे खोटे बोलत आहे. इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान या महाराष्ट्राने पाहिले नाही."