मुंबई Sanjay Raut On PM Narendra Modi :महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अनेक मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सध्या प्रचारात, महिलांच्या मंगळसूत्राचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेस आई-बहिणींचं मंगळसूत्र शिल्लक ठेवणार नाही. अशा प्रकारे राजस्थान मधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर देशभरासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यात मंगळसूत्रं गहाण पडत आहेत. जी व्यक्ती घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही, त्यांनी इतरांची उठाठेव करू नये, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय.
भाजपाच्या राज्यातच महिलांचे मंगळसूत्र गहाण : काँग्रेस नेते सॅम त्रिपोदा यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले की, यावर चर्चा होऊ शकते. त्यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही हे काँग्रेसनं स्पष्ट केलंय. तसंचमोदींनी जी नोटबंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्रं गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा जो रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं. काश्मीरमधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रं ही मोदी पुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्रं गेली. त्याला देखील मोदीच जबाबदार आहेत. किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? या देशात महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर आलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळंच असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
मोदीदेश विकायला निघालेत :नरेंद्र मोदी हे निवडणुका हरणार आहेत, 4 जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल. सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे, तो देश विकण्याचं काम एकच प्रधानमंत्री करत आहेत ते म्हणजे मोदी. ज्यांच्याकडं बहुमत आहे तो त्या पदापर्यंत जाईल, दहा वर्षापर्यंत तुमच्याकडं बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात. आमच्याकडं एकाहून जास्त चेहरे प्रधान मंत्रीपदासाठी असल्याचं राऊत म्हणाले.
अयोध्या आंदोलनात कुठे होते: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, देशात काँग्रेसचं राज्य असताना शिवसेना आयोध्या आंदोलनात उतरली. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला हे तयार नव्हते. स्वतः अमित शाह यांच्या पक्षाचे नेते सुंदर सिंग भंडारी यांनी स्वतः भाजपाचा या घटनेची काहीही संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केलं असल्याचं जाहीर केलं होतं. अमित शाह तेव्हा राजकारणात किंवा तिथे मैदानात तरी होते का? जेव्हा आयोध्येत आंदोलन सुरू होतं तेव्हा हे डरपोक लोक कुठे होते. तेव्हा मैदानात आम्ही आणि शिवसेना होती हे जगजाहीर आहे. अमित शाह यांची शेवटची फडफड सुरू आहे. 4 जून नंतर यांनी केलेली सर्व कांडं बाहेर येतील. हे लोक निवडणुका हरणार आहेत. त्यामुळं रामाच्या नावानं आणि अयोध्याच्या मुद्द्यावरून निवडणुका जिंकण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे.