महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"बाळासाहेब ठाकरे अन् काँग्रेसचं वैर..."; नात्याची आठवण करुन देत संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल - BALASAHEB THACKERAY

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील अनेक नेतेमंडळी त्यांना अभिवादन करत आहेत. बाळासाहेबांची आठवण काढत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.

Sanjay Raut Attacked on CM Eknath Shinde
संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2024, 3:53 PM IST

Updated : Nov 17, 2024, 4:17 PM IST

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. "बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज बारा वर्षे झाली. बाळासाहेब शरीरानं गेले पण त्यांचे विचार अजूनही आमच्यासोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. परंतु, त्याच बाळासाहेबांचे विचार संकटात आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी, महाराष्ट्रासाठी लढाई लढत आहोत," असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात आमची लढाई :"मराठी माणसाच्या हक्काचे उद्योगधंदे, रोजगार आज बाहेरच्या राज्यात पळवले जात आहेत. बाळासाहेबांना हे मान्य नव्हतं. म्हणून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, मराठी माणसाचा स्वाभिमानासाठी आमची लढाई आहे. बाळासाहेबांचे विचार नेहमी जिवंत राहावे हा आमचा प्रयत्न आहे. बाळासाहेब गेल्यानंतर पहिल्यांदाच बारा वर्षानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विचारासाठी आम्ही लढत आहोत. त्यांचे विचार कधीही विसरता येणार नाहीत. महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात आमची लढाई आहे," असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोरांवर टीका केली.

आम्हाला काय शिकवणार? :"दिल्लीची हुजरेगिरी करणं, मुजरे घालणं, तळवे चाटणं हे देखील बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत त्यांनी देश विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमी पाठिंबा दिला. तसेच राज्यातील बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार या नेत्यांशी बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी या काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी पाठिंबा दिला. पण एकनाथ शिंदे यांना ते माहिती नाही. एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याच्या बाहेरचं जग पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल शिकवू नये", असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

मोदींवर पीएचडी केली पाहिजे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मोठमोठे आश्वासन दिलेली आहेत. 2014 पासून त्यांनी अनेक मोठी स्वप्न दाखवली. मोठमोठे आश्वासनं दिली. पण त्यातले किती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली? हा एक संशोधनाचा विषय आहे. मोदी किती खरं बोलतात हे सर्वांना माहिती आहे. ते सातत्याने खोटं बोलत आहेत. खोटं बोलणं हा त्यांचा धंदा आहे. खोटं बोलण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडीची डिग्री घेतली पाहिजे," अशी खोचक टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

हेही वाचा -

  1. बाळासाहेब ठाकरेंचा 12 वा स्मृतीदिन; शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंकडून अभिवादन!
  2. "बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता अन् त्यांच्याच...", प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
  3. "राहुल गांधींच्या तोंडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे..."; पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा
Last Updated : Nov 17, 2024, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details