प्रतिक्रिया देताना संजय दिना पाटील मुंबई Sanjay Dina Patil Interview :मुंबईतील ईशान्य लोकसभा मतदारसंघ (Mumbai North East Lok Sabha Constituency) नेहमीच चर्चेत आहेत राहिला आहे. या ठिकाणी मागील दहा वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. या ठिकाणी सध्या महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे उभे आहेत. या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. शिवाजी नगर ते मुलुंडपर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे. इथे मी जर निवडून आलो तर प्राधान्याने सामान्य लोकांच्या, तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्यानं सोडवणार असं ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.
विजयाची शंभर टक्के खात्री :आमचा प्रचार जोरदार सुरू आहे. अगदी तळागाळातील आणि सामान्य लोकांपर्यंत आम्ही रोज पोहोचत आहोत. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आम्ही ऐकून घेत आहोत. लोकांना विकास हवा आहे. फक्त आश्वासन नको तर ज्या काही त्यांच्या मोजक्या समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्यात असं लोकांकडून सांगण्यात येत आहे. आम्ही ज्यावेळी प्रचारात फिरतो त्यावेळी लोकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. लोकही आम्ही तुम्हालाच मत देणार असं सांगत आहेत. मागच्या वेळी जे इथे खासदार निवडून आले होते. ते शिवसेना-भाजपा युती असल्यामुळं आणि शिवसेनेची मोठ्या प्रमाणात मतं असल्यामुळं निवडून आले होते. मात्र, आता तसं होणार नाही आमचा विजय हा 100 टक्के आहे. तसेच विजयाची 100 टक्के खात्री आहे, असं संजय दिना पाटील यांनी सांगितलं.
कोविड काळात दिवस रात्र कामे केले :आम्ही कोणत्याही स्वार्थासाठी काम करत नाही. आम्ही ग्राउंडवरती उतरून लोकांसाठी काम करतो. आम्हाला काहीतरी हवं आहे म्हणून मी राजकारणात नाही. आम्ही समाजाची सेवा करतो. जेव्हा कोविड काळात सगळे घरी बसले होते, त्यावेळी आम्ही दिवस-रात्र उतरून लोकांसाठी काम करत होतो. माझ्या कार्यालयात अनेक जीवनावश्यक साहित्यांचं वाटप केलं. मला दोन ते तीन वेळा कोविड झाला तरीपण मी त्याची तमा बाळगली नाही. लोकांसाठी झटत राहिलो. जे आता मोठमोठे बोलत आहेत. सध्या असलेले खासदार कुठे होते? असा सवाल संजय पाटील यांनी उपस्थित केलाय. कोणत्याही आजाराची तमा न बळकता आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो आणि कोविड काळात स्वतःला झोकून देऊन दिवस-रात्र काम केलं असंही संजय दिना पाटील यांनी सांगितलं.
रुग्णालय आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावणार : पुढे बोलताना संजय दिना पाटील म्हणाले की, माझ्या मतदारसंघात अनेक रुग्णालयांचा तुटवडा आहे. जेव्हा कोणी आजारी पडतो तेव्हा त्याला चांगल्या उपचारांची गरज असते. परंतु, अत्याधुनिक रुग्णालयाची कमतरता आहे. हा सामान्य माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळं मी प्रायोरिटीने इथे अधिकाधिक अत्याधुनिक कशी रुग्णालय होतील हे बघणार आहे. तसेच कित्येक वर्षापासून भांडुपमधील जो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे. मुंबई आणि आसपास परिसरातील कचरा भांडुप डंपिंग ग्राउंडवर फेकला जातो, हा भांडुप येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तो मी प्राधान्यानं निकाली काढणार.
ड्रग्स आणि झोपड्यांचे पुनर्वसन : सध्या राज्यात ड्रगचा सुळसुळाट आहे. अनेक ठिकाणी ड्रग्स पकडलं जात आहे. सध्याची तरुण हे ड्रग्स विळख्यात अडकली आहेत. माझ्या मतदारसंघातील गोवंडी येथेही ड्र्क्समुळं काही दिवसापूर्वी एका मुलाला जीव गमाव लागला. मात्र, ड्रग्सवर कसा आळा घालता येईल आणि तरुण पिढीनं याच्या आहारी जाता कामा नये, यासाठी आपण यावर काम करणार आहे. ड्रग्सचा नायनाट हा झालाच पाहिजे. यासाठी आपण संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहोत. याचबरोबर शिवाजीनगर, मानखुर्द, विक्रोळी, घाटकोपर आणि भांडुप आदी भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत. या झोपडपट्ट्या पुनर्वशाच्या प्रतीक्षेत आहेत. यांचे पुनर्वसन किंवा झोपडपट्टीमधील लोकांचे जे मूलभूत प्रश्न असतील. त्या मी प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलंय.
4000 पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित केले : मी 2009 ते 2014 पर्यंत खासदार होतो. या कालावधीत अनेक समाज उपयोगी कामे केली. माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आणि मी फक्त शांत बसलो नाही. तर संसदेतील सभागृहात 4000 पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित केले. जे प्रश्न मी विचारले त्यांचा पाठपुरावा केला आणि जे लोकांना सुविधा हव्यात. लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मी माझ्या खासदारकीचा शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला. आताही मी जरी खासदार नसलो तरीही माझ्या मतदारसंघातील ज्या काही जनसामान्यांच्या समस्या आहेत. त्या सोडवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करत आहे, असंही संजय दिना पाटील यांनी सांगितलंय.
वडापाव खात असलेला व्हिडिओ व्हायरल: संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रचारा दरम्यान पिंजून काढत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. तापमानाचा पारा वाढला असला तरीही पुन्हा उन्ह तानाची तमा न बाळगता प्रचार करत आहेत. प्रचार करताना आपणाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही एक आमच्यातीलच आहात असं लोकांकडून सांगण्यात येत आहे. मी काही मोठा नेता नाही. मी तुमच्यातलाच एक आहे असं मी लोकांना सांगत आहे. त्यामुळं लोक मला आपला समजून प्रेम आणि पाठिंबा देत आहेत. दोन दिवसापूर्वी प्रचार करताना एका आजीबाईच्या वडापावच्या गाडीवर त्या आजीबाईंनी वडापाव खाण्याचा आग्रह केला. यावेळी माझ्यासोबत आमदार सुनील राऊत ही होते. आम्ही वडापाव खात होतो, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून लोकांकडून आपणाला सहानुभूती, प्रेम मिळत आहे. असंही संजय दीना पाटील यांनी सांगितलंय.
विरोधकांना सूचक इशारा : सध्या सत्ताधारी लोक मोठमोठ्यानं बोलत आहेत. मोदींच्या नावानं मोठमोठे आश्वासन देत आहेत. मात्र, यापूर्वी दिलेल्या आश्वासन त्यांनी कितपत पाळलं किंवा ती काम पूर्ण केली का? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे रोज उठून विरोधक आमच्या पक्षावर आणि महाविकास आघाडीवरती टीका करत आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांचंही मटेरियल आमच्याकडं खूप आहे पण आम्ही ते बाहेर काढत नाही. पण जर सत्ताधाऱ्यांनी मर्यादा उलाडली तर ते सुद्धा मटेरियल आम्हाला बाहेर काढावं लागेल, असा सूचक इशारा या यावेळी संजय दिना पाटील यांनी सत्याधारी पक्षाला दिलाय.
हेही वाचा -
- सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे 'व्हू ईज धंगेकर' लोकसभेत काय करणार? 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत - Ravindra Dhangekar Interview
- विकासाचे मुद्दे ते काँग्रेसकडून होणारे आरोप; भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची विशेष मुलाखत - Murlidhar Mohol Interview