नाशिक : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं. यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आज नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. "आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळं आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे. आपण अनेकदा मंत्रिपदावर काम केलं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून मी राज्यातील जनतेसाठी काम केलं आहे. मला मंत्री पदाची कुठलीही हाव नाही. आपण सभागृहात, रस्त्यावर उतरून आवाज उठवणार. राज्यासह देशभरात ओबीसींचा एल्गार पुकारणार, त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे," असं प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केलं.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नसल्यानं भुजबळ समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळातून डावलल्याबद्धल छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना जबाबदार धरलं आहे. "मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यासह देशभरातून लोकांचे मला फोन, मेसेज येत आहेत. मतदारसंघातील जनता पक्षाच्या निर्णयावर नाराज झालीय. सर्व समाज जागृत झाला आहे. कुणीही पेटवा पेटवी न करता शांततेच्या मार्गानं आपला निषेध व्यक्त करावा. महापुरुषांना देखील समाजात काम करत असताना त्रास सहन करावा लागला आहे. काही लोकांना समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे, त्यांना आपला विरोध आहे," असं छगन भुजबळांनी यावेळी बोलताना म्हटलं.
मराठा आरक्षणाला प्रथम मी पाठिंबा दिला :छगन भुजबळ पुढे म्हणाले, "आरक्षणानं सर्वच प्रश्न सुटतात, असं नाही. मात्र समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. सभागृहात ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळी सर्वात प्रथम मी पाठिंबा दिला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ही सर्वांचीच मागणी आहे. ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन दोन्ही समाजाचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. त्यामुळं वेगळं आरक्षण देण्याची मागणी आहे. आपण मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण कुणाशीही चर्चा करायला तयार आहोत. आपल्या विरुद्ध जे काम करताय त्यांच्या विरोधात आपल्याला लढायला हवं."
एक है तो सेफ है : "आपला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. कुठल्याही वंचित घटकावर अन्याय होऊ नये, हीच आपली भूमिका असून दलीत, आदिवासी, मागासवर्ग यांनी सर्वांनी एकत्र राहायला हवं, हम एक है तो सेफ है," असं त्यांनी सांगितलं. "काही लोक आपल्याबाबत वेगळा विचार करत आहेत. त्यांना सांगायचं आहे की, लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाज घटकांनी महायुती सरकारला बहुमत मिळवून दिलं आहे," असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.