मुंबई Rohit Pawar ED Enquiry : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आलीय. यापूर्वी म्हणजेच 24 जानेवारीलादेखील रोहित पवार यांची ईडीनं 11 तास चौकशी केली होती.
चौकशीनंतर रोहित पवारांनी मांडली भूमिका : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळ्या प्रकरणी रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलीय. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, "माझी जी चौकशी सुरू आहे, त्यासाठी मी तिथं गेलो होतो. काही कागतपत्रं, माहिती मला मागण्यात आले होते. ते देण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी काम केलं. एमएससी बॅंकेतून जे काही व्यवहार झाले. त्या काळचे जे व्यवस्थापक होते त्यांनी व्यवहार केले त्यावर आक्षेप आहे. त्यांनी ज्यांना लोन दिले ते एनपीए झाले."
मी काही चुकीचं केलेलं नाही : पुढं बोलताना रोहित पवार म्हणाले, "या अख्या पीआयएलमध्ये माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव नाही. ईओडब्लूनं यापूर्वी दोनवेळा चौकशी केल्या आहेत. त्यात काही हातात आलं नाही. अनेक वर्ष ही चौकशी केली जातेय. क्लोजर रिपोर्ट इओडब्लूनं हायकोर्टाला दिला. याचा अर्थ हाच निघतो की त्यात त्यांना काही मिळालं नाही. मला क्लोजर रिपोर्ट काय असतो हे माहित नव्हतं. खरेतर याच केसवरून ईडीनं हा तपास सुरू केला होता. तेव्हा तो संपायला पाहिजे होता. याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस, ईओडब्लूचे अधिकारी यांना त्या केसमध्ये काही दिसलं नाही. हे सरकार आमचं नाही. आम्ही विरोधात आहेत. पण तरी हा रिपोर्ट दिला गेला. मुंबईत कुठं तरी सोन्याचा हंडा लपला आहे, तो शोधायचा आहे. तो कथित माहितीच्या आधारे आहे. तसा हा तपास आहे. अधिकारी त्यांचं काम करत आहेत. मी काही चुकीचं केलं नाही. मी आधी व्यवसायांचं आलो. मग राजकारणात आलो. माझी मनीलॅांडरींग ते शोधत असतील तर शोधच राहतील. त्यांना काही सापडणार नाही. हे लोक आपलेपणाने आले आहेत. मी ईओडब्लू, ईडी या सगळ्यांना सामोरे गेलो. लोक माझ्यासोबत येतात. त्यांच्यासोबत कोणी आलं नाही, हे त्यांचे दुखणं आहे. या यादीत अजून 20 लोकांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीचे काय झाले. हा प्रश्न सर्व सामान्य विचारत आहेत."
- 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं :रोहित पवारांना या चौकशीच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रं सादर करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावलंय. यापूर्वीही 24 जानेवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांची 11 तास चौकशी केली होती.
हेही वाचा :
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा घंटानाद, रोहित पवार यांची ईडी कार्यलयात पुन्हा चौकशी
- "रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करताय", उमेश पाटलांची जोरदार टीका
- "माझ्यामागे बापमाणूस, दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही", 12 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया