मुंबई Rajya Sabha Elections : देशातील राज्यसभेच्या 56 जागा रिक्त होणार असून यासाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने 14 उमेदवारांची घोषणा केली असून महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या 3 जागांसाठी अद्याप घोषणा झालेली नाही. 15 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्यानं यासाठी फक्त आता दोन दिवसाचा अवधी शिल्लक राहिल्यानं दिल्लीमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये खलबतं सुरू आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री, आमदार, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानं ते भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशा परिस्थितीत अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर भाजपाकडून वर्णी लागण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी काही बोलण्यास नकार दिला असला तरीसुद्धा दिल्ली दरबारी याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये हालचालींना वेग आला आहे.
3 जागांसाठी अनेक नावे चर्चेत :भाजपाने युपी, बिहार, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परंतु महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केली नाहीत. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि व्ही मुरलीधरन या भाजपा खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यांच्या जागी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, बिहारचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई उत्तर भारतीय मोर्चाचे संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत आहेत. विशेष म्हणजे भाजपाने राज्यसभेसाठी घोषित केलेल्या 14 उमेदवारांमध्ये एकाही केंद्रीय मंत्र्याचा समावेश नसल्यानं नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर उमेदवारी दिली जाईल का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
पंकजा मुंडे बाबत योग्य निर्णय :भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मागील 5 वर्षात राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी नेहमी नाव चर्चेत राहिलं. परंतु, तरीही त्यांचं राजकीय पुनर्वसन भाजपाकडून करण्यात आलं नाही. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेत जायचं की, राज्यसभेत जायचं? हे ठरवायला आता फार उशीर झाला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. तसंच मला कुठं जायला आवडेल, त्यापेक्षा लोकांना मला कुठं बघायचंय हे महत्त्वाचं असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलंय. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून त्यांच्याबाबत पक्षात आदर आहे, आणि त्यांच्याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंसंदर्भात अद्याप निर्णय नाही : दुसरीकडे राज्यसभेसाठी भाजपाने घोषित केलेल्या 14 नावांमध्ये एकाही केंद्रीय मंत्र्यांचा समावेश नसल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही धाबे दणाणले आहे. नारायण राणे यांना राज्यसभेवर पुन्हा पाठवले जाणारी शक्यता फारच कमी आहे. तसंच त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनाही त्यांच्या जागी सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे. अशा परिस्थितीमध्ये नारायण राणे यांनी पूर्ण दबावाचं तंत्र अवलंबलं असून काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्याचबरोबर निलेश राणे हे लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
हेही वाचा -
- राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराची निश्चिती नाही - सुनील तटकरे
- महाविकास आघाडीतील मतं फोडण्याचा भाजपाचा पुन्हा प्रयत्न, राज्यसभा निवडणुकीत भाजपा देणार चौथा उमेदवार?
- काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोकराव चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, एक ते दोन दिवसात ठरविणार राजकीय दिशा