पुणे Pune Loksabha constituency : यावर्षी देशभरात लोकसभा निवडणूक होणार असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून एकूण 5754 मतदार शतायुषी असल्याचं समोर आलंय.
निवडणूक आयोगानं जाहीर केली मतदार यादी : पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी तसंच निवृत्त लोकांचं शहर असं म्हटलं जाते. अनेक लोक निवृत्तीनंतर पुणे जिल्ह्यात राहण्यासाठी येतात. तसंच नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यात आलेले बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक होतात. पुण्यातच आपला मतदानाचा हक्क बजावतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक आयोगानं मतदारयादी जाहीर केली असून त्यानुसार शहरासह जिल्ह्यात 5754 मतदार हे शंभरीपार केलेले असल्याचं समोर आलंय.
कोणत्या वयोगटातील मतदारात घट : 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत 18 ते 49 वयोगटातील मतदारांची संख्या 51 लाख 13 हजार 802 होती. त्यानंतर या वयोगटातील मतदारांचे नव्यानं मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. त्यामुळं अंतिम मतदार यादीत या वयोगटाची संख्या 1 लाख 41 हजार 299 नं वाढून 52 लाख 55 हजार 101 एवढी झालीय. त्यापुढील म्हणजेच 50 ते 120 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदार प्रारुप यादीत 29 लाख 59 हजार 381 होते. अंतिम मतदार यादीत या वयोगटातील मतदारात 87 हजार 463 नं घट झालीय. त्यामुळं या वयोगटाचे मतदार 28 लाख 71 हजार 918 झाले. या वयोगटाचे मतदार मृत झाले किंवा स्थलांतरित झाल्यानं त्यात घट झाल्याचं जिल्हा निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.
कोणत्या वयोगटातील किती मतदार : जिल्हा निवडणूक आयोगानं अंतिम मतदार यादी जाहीर केलीय. त्यात 15 लाख 77 हजार 872 ज्येष्ठ मतदार आहेत. त्यापैकी 60 ते 69 वयोगटाथील 8,39,893 मतदार, 70 ते 79 वयोगटाचे 4,89,187 मतदार, 80 ते 89 वयोगटाचे 1,94,911 मतदार, तर 90 ते 99 वयोगटाचे 48,127 मतदार, 100 ते 109 वयोगटाचे 5722 मतदार असून 110 ते 119 वयोगटाचे 22 मतदार असून 120 पेक्षा अधिक 10 मतदार आहेत. एकूणच 100 ते 120 वयोगटाचे एकूण 5754 मतदार असल्याचं समोर आलंय.
घरातून मतदान उपक्रम : निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार वयोमान, आजारपणामुळं अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळं मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून 80 वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पुणे तेथे काय उणे! पुण्यात 'इतके' शतायुषी मतदार बजवणार मतदानाचा हक्क - घरातून मतदान
Pune Loksabha constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार यादी जाहीर करण्यात आलीय. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 5754 मतदार शंभरीपार असल्याचं समोर आलंय.
Pune Loksabha constituency
Published : Feb 24, 2024, 2:59 PM IST