सातारा Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला घेरलंय. "भाजपा सरकारला लोकसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळा अनावरणाचा इव्हेंट करायचा होता. म्हणून सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा उभारताना नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला," असा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
शिवरायांच्या प्रतिमेचा इव्हेंटसाठी वापर : "शिवरायांच्या प्रतिमेचा केवळ इव्हेंटसाठी वापर केला गेला. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. पुतळ्याच्या मूळ टेंडरमध्ये कामाचा कालावधी किती होता? उद्घाटनाची तारीख कोणी ठरवली? ओतीव आणि भरीव पुतळा तयार होणार असताना पत्र्याचा पुतळा का केला गेला? त्यासाठी कोणी निर्देश दिले, असे अनेक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. नौदलाच्या जागेवर पुतळा उभारला होता. परंतु, सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची होती, असंही ते म्हणाले.
सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे :लोकसभा निवडणुकीपूर्वी इव्हेंट करता यावा. पंतप्रधानांना तिथं येऊन भाषण करता यावं, म्हणून हा निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच नौदलाची जबाबदारी असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यातील मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही ते म्हणाले.