ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ते पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत रविवारी पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरवस्था, अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली. तसंच पहिल्याच दिवशी कारवाई टाळत असल्याचं स्पष्ट करून एक महिन्याचा अल्टीमेटम देत चुकीला क्षमा नाही असा इशाराही एसटी प्रशासनाला दिला आहे.
खोपट बस आगाराची केली पाहणी : राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी रोजी खोपट बस आगार येथे परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरता परिवहन मंत्री सरनाईक यांनी रविवारी खोपट बस आगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली.
प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक (ETV Bharat Reporter) सर्वच बस आगारांना भेट देऊन समस्यांचा आढावा घेणार : प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा तसंच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. खोपट बस आगारातील अतिक्रमण तसंच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन आणि समस्यांचा आढावा घेणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
एका महिन्यात बदल अपेक्षित :हे श्रद्धा आणि सबुरीचं फळ असल्याचं स्पष्ट करत सरनाईक यांनी मंत्री बनल्यानंतर सर्वप्रथम ठाण्यापासून सुधारणा करण्याचं ठरवलं. त्यानुसार रविवारी खोपट आगाराची पाहणी करून पहिल्याच दिवशी कारवाई करणं योग्य नसल्यानं एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर चुकीला क्षमा नाही. अशी तंबीही सरनाईक यांनी प्रशासनाला दिली आहे.
हेही वाचा -
- शिवसेना-भाजपामधील अंतर्गत वाद संपुष्टात; नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक एकत्र
- "सर्वसामान्य माणसाचा खिसा खाली करण्यासाठी...", मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत प्रताप सरनाईकांचा आघाडीला टोला
- ठाण्यात तेलुगु समाजासाठी कम्युनिटी अँड कल्चर सेंटर बांधणार, प्रताप सरनाईकांचं आश्वासन - Telugu Community and Culture Center