मुंबई Mohan Bhagwat On Shivaji Maharaj :मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. घटनेमुळं महायुती सरकार धास्तवलेलं असतानाच आता सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळं, पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शिवाजी महाराजांबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेलं वक्तव्य, त्याबरोबर मोहन भागवत याचं वक्तव्य या कारणानं भाजपाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास तर पुसला जात नाही ना? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे.
काय आहे वक्तव्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं, "इंग्रजांच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज येथून होऊन गेले. इथे देखील त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनीच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली", रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. आशा प्रकारचा भ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतिहास कोणालाही बदलता येणार नाही - भुजबळ : मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. तसंच शिवजयंती देखील त्यांनी सुरू केली असल्याचं भुजबळ यांनी म्हटंल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पहिला पोवाडा देखील महात्मा फुले यांनीच लिहिला, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
भागवतांचे वक्तव्य दिशाभूल करणारे - वडेट्टीवार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचं इतिहास सांगतो. तसे पुरावे देखील आहेत. संघाचे लोक काहीही शोध लावतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटलीच नाही, तर इतिहासकार म्हणतात सुरत लुटली. त्यामुळं मोहन भागवत यांचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. तर राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याविषयीचं वक्तव्य आपण ऐकलं नसून त्यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलं.