शिर्डी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी भाजपानं (BJP) गेल्या आठवड्यात शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं. त्यानंतर आठवडाभरातच भाजपाचा सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही (NCP) याच मुद्द्यावर शिर्डीत पक्षाचे अधिवेशन आयोजित केलंय.
भाजपाचं अधिवेशन : गेल्या आठवड्यात भाजपानं शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं होतं. 'श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी' असा संदेश देत भाजपानं कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्रिय केलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानंही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला सुरुवात केलीय.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शिर्डी शिबिर (ETV Bharat Reporter) कुठं होणार शिबिर? : 'अजितपर्व..! दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची..!' हे घोषवाक्य असलेल्या या शिबिराचं 'नवसंकल्प' असं नामकरण करण्यात आलं. शनिवार (18 जाने.) आणि रविवार (19 जाने.) असे दोन दिवस शिर्डीतील हॉटेल पुष्पक येथे हे शिबिर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या शिबिराला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
कोण-कोण राहणार उपस्थित? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे म्हणाले की, "पक्षाचे आजी-माजी आमदार, विद्यमान 9 मंत्री, तालुका, जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख, असे मिळून जवळपास पाचशे पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणारं असेल. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं. त्यामुळं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत. त्यांचा हाच उत्साह पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळवून देईल. या शिबिरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळं या शिबिराला वेगळं महत्त्व आहे."
हेही वाचा -
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साईचरणी; म्हणाले 'समाजातील दुफळी लवकर दूर करण्यासाठी सरकार करणार प्रयत्न'
- मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा? संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत
- 'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली भाजपाची सदस्य नोंदणी, कुठं घडला प्रकार? पाहा व्हिडिओ