अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यात ज्या ठिकाणी 'जनसमान यात्रा' काढत आहे, त्या सर्व मतदार संघातील जागा या महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेससाठीच सुटणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संजय खोडके यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यात अमरावती आणि वरुड हे दोन मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार रविवारी अमरावतीत : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी अमरावतीत 'जनसमान यात्रे'करिता येणार आहेत. अजित पवार यांच्या 'जनसमान यात्रे'च्या तयारी संदर्भात संजय खोडके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. रविवारी दुपारी दीड वाजता संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीच्या विकासासाठी भरभरून निधी दिला असल्यानं अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते अजित पवारांचा भव्य सत्कार केला जाणार असल्याचं संजय खोडके म्हणाले.
संजय खोडकेंची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) सुलभा खोडके काँग्रेसच्याच : "सुलभा खोडके या अमरावतीच्या आमदार म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. असं असतानाही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण सुलभा खोडके यांना मिळत नव्हतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेन्निथला हे अमरावतीत आले असता पक्षाच्या आमदार म्हणून सुलभा खोडके या त्यांना भेटायला गेल्या. मात्र, चेन्निथला यांच्या कार्यक्रमातही सुलभा खोडके यांना हवा तसा मान मिळाला नाही. प्रदेशाच्या विधिमंडळाच्या बैठकीत मात्र सुलभा खोडके यांना वरिष्ठ नेते मुंबईत मान द्यायचे. असं असलं तरी आज देखील सुलभा खोडके या काँग्रेसमध्येच आहेत," असं संजय खोडके यावेळी म्हणाले.
वेळेपर्यंत सर्वच शर्यतीत :अमरावतीत महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटली, तर निश्चितच सुलभा खोडके या उमेदवार असू शकतात. आज मात्र सुलभा खोडके याच उमेदवार असतीलचं असं आम्ही म्हणू शकत नाही. महायुतीमध्ये असणारे भाजपाचे प्रवीण पोटे असो किंवा जगदीश गुप्ता हे देखील आम्ही उमेदवार असणार असं म्हणू शकतात. त्यांनी निश्चितच तशी तयारी करायला हवी. महायुतीची जागा राष्ट्रवादीसाठी सुटली आणि आम्ही उमेदवार असलो तर निश्चितच भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी आम्हाला जावंच लागेल, असं संजय खोडके म्हणाले.
हेही वाचा
- अभिनेते सयाजी शिंदेंनी हातात बांधलं घड्याळ; राष्ट्रवादीत केला प्रवेश, 'स्टार प्रचारक' म्हणून नियुक्ती
- नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं पत्र
- "शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची केलेली अवस्था..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला