मुंबई Lok Sabha Election : मुंबईत आज पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. मुंबईकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं जातो? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर मतदार यादीतून मागील वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्या मतदारांची नावं गायब असल्याचं समोर येत आहे. 'निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावंच यादीतून गायब असतात', असा आरोप मतदारांनी केलाय.
मतदार यादीत मृत व्यक्तींची नावं : मागील वर्षानुवर्ष दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर मतदान करणारे अजय कोंडेकर हे मागील काही वर्षापासून ठाण्याच्या घोडबंदर इथं राहत आहेत. 17 वर्षांपूर्वी ते दादर प्लाझा जवळ मोहसीन या नावाच्या एका इमारतीत राहात होते. ही इमारत पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आली. या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं सध्या अजय हे ठाण्यातील कासारवडवली घोडबंदर इथं राहत आहेत. मात्र, लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, अजय आपल्या कुटुंबासह बालमोहन येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी येतात. अजय यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, "मी प्रत्येक निवडणुकीला याच मतदान केंद्रावर मतदान करत आलो आहे. मात्र, मी जेव्हा मतदानासाठी आत गेलो तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचं नाव यादीत नाही. मग मी इतरांची नाव तपासली तेव्हा माझे काही शेजारी होते. त्यांची देखील नावं नसल्याचं निदर्शनास आलं. काहींची नावं या यादीतून गहाळ झाल्याचं समोर आलं. यात धक्कादायक बाब म्हणजे आम्ही जे जिवंत लोक आहोत यांची नावं या मतदार यादीत नाहीत. मात्र, आमच्या सोसायटीतील जे लोक आता मृत झाले आहेत त्यांची नावं मात्र या मतदार यादीत आम्हाला पाहायला मिळाली. ही माझी एकट्याची तक्रार नाही माझे आणखी काही रहिवासी साथीदार होते. त्यांचं देखील नाव या मतदार यादीत नाही."