मुंबई -महाविकास आघाडीच्या जागावाटपांचा गुंता आता सुटल्याची चिन्हे आहेत. आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची घोषणा केली जाईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. सूत्राच्या माहितीनुसार काँग्रेस १०५ ते १०० जागांवर निवडणूक लढविणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष १०० ते ९५ जागांवर तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष ८०ते ८५ जागांवर लढणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही महाविकास आघाडीचे घोडे जागावाटपावर अडलं होते. त्यासाठी बैठकांच्या मॅरेथॉन सुरू असताना मंगळवारी जागावाटपाचा तिढा सुटला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विदर्भ- मुंबईच्या जागांवरून काँग्रेस-ठाकरे पक्षामध्ये मतभेद-लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात आघाडी घेणारी महाविकास आघाडी यंदा विधानसभा निवडणुकीत मात्र मागे राहिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना जागावाटपाचा तिढा जलद गतीने सोडवता आला नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यात विदर्भ आणि मुंबईच्या जागेवर सुरू असलेला वाद हा जागावाटपाच्या होणाऱ्या विलंबास कारणीभूत ठरला आहे. अशात राष्ट्रवादीचे (NCP SP) अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता हा वाद जवळपास संपला आहे. याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "आमच्यातील जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. अजून चार-पाच जागांवर चर्चा सुरू आहे. परंतु बुधवारी दुपारपर्यंत हा तिढा सोडवला जाईल. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती दिली जाईल.
बंडखोरीचं प्रमाण वाढू शकतं-भाजपानं सर्वात अगोदर त्यांच्या ९९ उमेदवारांची यादी घोषित केल्यावर बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नाराज उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. एकनाथ शिंदे पक्षानं त्यांच्या ४५ उमेदवारांची यादी घोषित केल्यावर अनेक नाराज बंडखोरीच्या प्रयत्नात आहेत. अशात जागावाटपाची घोषणा झाल्यास महाविकास आघाडीतही बंडखोरीचं प्रमाण वाढू शकतं याची भीती महाविकास आघाडीलाही आहे. परंतु उमेदवारी अर्ज भरण्यास फारच कमी अवधी असल्याने लवकरात लवकर जागा वाटप करणे महाविकास आघाडीला गरजेचं झालं आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास फक्त ५ दिवस शिल्लक- विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच शनिवार २६ ऑक्टोंबर आणि रविवार २७ ऑक्टोंबर या दोन दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडे फक्त ५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
हेही वाचा-
- " जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले
- जागावाटपाकडं इच्छुकांचे लागले डोळे, महायुतीसह महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येणार?
- मोठ्या पक्षांच्या राजकारणात लहान पक्ष 'उपेक्षित', जागावाटपात दिलं जातंय दुय्यम स्थान