मुंबई Mumbai High Court Hearing :प्रभू श्रीरामाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिर्डी येथील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या प्रकरणी राज्यातील विविध ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळं राज्यातील विविध भागात दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे ठाण्यात एकाच ठिकाणी वर्ग करावेत, अशी मागणी करणारी याचिका आमदार आव्हाड यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गुरुवारी (18 जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे शिर्डीमध्ये वर्ग करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले.
सात ठिकाणी गुन्हे दाखल : "प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते," असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. तसंच हे वक्तव्य आपण पूर्ण अभ्यास करुन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर राज्यात सात ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सातपैकी दोन गुन्हे मुंबईत तर बाकी गुन्हे पुणे, शिर्डी, ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर, यवतमाळ या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. जाणीवपूर्वक धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याविरोधात भादंवि कलम 295 (ए) अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्यात सात ठिकाणी नोंदवलेले सर्व गुन्हे ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्थानकात किंवा नवघर पोलीस स्थानकात वर्ग करण्याची मागणी आव्हाडांतर्फे अॅड. सागर जोशी आणि अॅड. विनोद उतेकर यांनी केली होती.