मुंबई MLC Results 2024 : विधान परिषदेच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीनं सर्वच 9 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला तीन जागांपैकी दोन जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा फायदा महायुतीला झाला. दरम्यान, यावरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या आमदारांना महायुतीकडून कोट्यवधी रुपये आणि काही एकर जमीन दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या दोघांच्या आरोपानंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीवर संजय राऊत, जिंतेद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी टीका केली आहे.
बाप दाखवा आणि श्राद्ध घाला : दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जो पराभवाचा धक्का बसलाय. त्यामुळं संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड अक्षरशः बावचळले आहेत. आमदारांना कोट्यवधी रुपयांची लेन-देन झाली. अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केलेत. पण जर तुमच्याकडे कोणतेही पुरावे असतील, फोटो, व्हिडिओ किंवा आणखी काय पुरावे असतील तर माध्यमांना त्या किंवा संबंधित जबाबदार यंत्रणा द्या. नाहीतर बाप दाखवा आणि श्राद्ध घाला.