मुंबई Uddhav Thackeray Speech : शिवसेना पक्षाच्या मार्मिक साप्ताहिकाचा 64 वा वर्धापन दिन आज (13 ऑगस्ट) मुंबईतील शिवाजी मंदिर या नाट्यगृहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते तसंच उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मार्मिक एक चमत्कार : यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मार्मिक आज 64 वर्षाचा झालाय. पण यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण मार्मिक आजही ताजातवाना, तरुण आहे. मार्मिक एक चमत्कार असून ही सगळी किमया एका व्यंगचित्रकारानं एका कुंचल्यामुळं घडवली आहे. मराठी माणसानं रक्त सांडून ही मुंबई महाराष्ट्रात मिळवली. संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षानंतर मराठी माणसाच्या करमणुकीसाठी माझे वडील आणि काकांनी मार्मिकची स्थापना केली. मार्मिकला अनेक मोठ्या संपादकांची परंपरा लाभलीय. प्रत्येक संपादकांनी हा किल्ला समर्थपणानं लढवलाय."
मी शत्रूची पर्वा का करू? : "माझ्यासमोर शिवसेनेची स्थापना झाली. जो नारळ फुटला, त्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. ते शिंतोडे एवढे उडतील, असं मला कधी वाटलं नव्हतं. आज त्या शिवसेनेचा मी पक्षप्रमुख आहे. मी हा वारसा किती समर्थपणे पुढं नेतोय, मला माहित नाही. परंतु, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. अगदी संकटाच्या काळात सुद्धा मला एकटं सोडलं नाही. त्यामुळं मी शत्रूची पर्वा का करू? मी शत्रूची पर्वा अजिबात करत नाही", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
'वाचा आणि थंड बसा' : "संयुक्त महाराष्ट्रानंतर मार्मिकची स्थापना झाली. याकाळात मराठी माणसाला रोजगार मिळत नव्हता. मराठी माणसाच्या नोकरीसाठी 'स्थानीय लोकाधिकार समिती'ची स्थापना करण्यात आली. पुढं मार्मिकनं आणि स्थानीय लोकाधिकार समितीनं मराठी माणसाला नोकरीसाठी न्याय मिळवून दिला. ही मार्मिक आणि शिवसेनेची ताकद आहे. पुढं मार्मिकमधून 'वाचा आणि थंड बसा' अशी व्यंगचित्र येऊ लागली. मार्मिकमुळं मराठी माणूस पेटून उठला. मराठी माणूस एकत्र आला आणि त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाल्याचं ठाकरेंनी सांगितलं.
उद्या मार्मिक आमचा आहे असं कोणी म्हणेल : "आता संपादकांनी सांगितलंय की मार्मिकची वर्गणी वाढवा. परंतु आता काळ असा आहे की, मार्मिकची वर्गणी आमच्याकडं जास्त आहे, म्हणून कोणी मार्मिक आमचा आहे, असं म्हणतील" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
मशालीची धग त्यांच्या बुडाखाली लावायची :पुढं ते म्हणाले, "एअर इंडियाच्या अधिकाऱ्याच्या एका कानाखाली आवाज काढल्यानंतर मराठी माणसासाठी एअर इंडियात नोकरीसाठी दरवाजा उघडले. तेव्हा सुद्धा कुंचल्याचा पलिता झाला होता. वातावरण ढवळून निघालं होतं. आजही मशालीची पलिता झाली आहे, तर कुंचल्याची मशाल झाली आहे. मी मशाल उगाच हाती नाही घेतली. आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होत असेल, तर जे दिल्लीत महाराष्ट्रद्वेष्टी बसलेले आहेत. त्यांच्या बुडाखाली मशालीची धग लावायची की नाही?", अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी-शाह यांच्यावर केली.
हेही वाचा -
- दिल्लीत जाऊन गुन्हेगाराला भेटणं मोठा गुन्हा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
- महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? जाणून घ्या नेत्यांचं मत काय? - face of chief minister
- उद्धव ठाकरेंनी दिल्लीत कोणाचे उंबरठे झिजवले? मंत्री शंभुराज देसाई यांचा संजय राऊतांना सवाल - ShambhuRaje Desai