मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली मुंबई Devendra Fadnavis On Maratha Reservation :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, "यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. तसंच मराठा समाजाला आरक्षण फक्त शिंदे सरकारच देऊ शकतं.. हे उद्धव ठाकरेंनाही माहित आहे," असा टोलाही यावेळी फडणवीसांनी लगावला.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा: यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आनंदाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं एससीबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मान्य केलंय. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयानं त्यात त्रुटी काढल्यानंतर ते रद्द झालं. त्यानंतर न्यायाधीश भोसले यांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीनं पूर्ण अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयानं काढलेल्या त्रुटी कशा दूर करता येतील त्यावर आधारित माहिती राज्य मागासवर्ग आयोगाला दिली."
राज्य मागासवर्ग आयोगाचं मनापासून आभार-पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्य मागासवर्ग आयोगानं अडीच कोटी पेक्षा जास्त घरांत जाऊन सर्व्हे केला. त्यावर मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण देणं योग्य ठरेल, हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या शुक्रे कमिटीनं सांगितलं. या अहवालातील शिफारशी महाराष्ट्र मंत्रिमंडळानं स्वीकारल्या आहेत. त्यावर आधारित कायदा तयार करण्यात आलाय. यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याकरिता मी राज्य मागासवर्ग आयोगाचं मनापासून आभार मानतो."
ओबीसी समाजाला अडचण होणार नाही : पुढं ते म्हणाले की, "तूर्तास आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे. विविध मार्गांनी महामंडळ, संशोधन संस्था यातून मराठा समाजातील तरुणाईला न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे. हे करत असताना ओबीसी समाजाला अडचण होणार नाही, याची काळजी घेतली आहे. वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ओबीसी आता गुण्यागोविंदानं राहतील", असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
आता मराठा समाजाला नोकऱ्या मिळतील : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर झालेलं असताना विधानभवनाच्या बाहेर विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. यावर बोलताना फडणवणीस म्हणाले की, "अशा पद्धतीनं बोलणं हे विरोधकांचं कामच आहे. परंतु जनतेनं हे सुद्धा पाहिलंय की, हे विधेयक एकमतानं मंजूर झालंय. याचा अर्थ विरोधकांची दुहेरी भूमिका आता जनतेला समजून चुकली आहे. निवडणुका असो किंवा नसो यासाठी आम्ही दीड वर्षांपासून या विधेयकावर मेहनत घेतली होती."
उद्धव ठाकरेंना लगावला टोला : कायदा मंजूर झाला असला तरी नोकऱ्या भेटतील का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकदा कायदा मान्य झाला, त्यानंतर आता ज्या जाहिरातीत निघतील. त्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जाईल. उद्धव ठाकरे यांना हे सुद्धा माहित आहे की, मराठा समाजाला आरक्षण हे एकनाथ शिंदे सरकारच देऊ शकेल", असा टोलाही यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
हेही वाचा -
- मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला; विधेयकामुळं मराठा समाजाला मिळणार 10 टक्के आरक्षण
- मराठा आरक्षणामुळं सर्व गुणवंतांची कत्तल होणार असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, जाहीर केला मोठा निर्णय
- मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर