नाशिक Manoj Jarange Patil Rally Nashik :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये भव्य रॅली होत आहे. नाशिक हा ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा गड मानला जातो. यामुळं मराठा आणि ओबीसी नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळं रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत.
लाखो मराठा बांधव नाशिकमध्ये दाखल :मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आज (मंगळवारी) शहरातून मराठा आरक्षण रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव नाशिकमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. रॅलीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या 'भुजबळ फार्म' (Bhujbal Farm Nashik) या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मराठा आरक्षण रॅली सुरू आहे. आज या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होत आहे. मराठा समाजाच्या वतीनं शहरात स्वगताची तयारी झाली. राज्यभरातून हजारो समर्थक या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पोलिसांकडून घडामोडींवर लक्ष : नाशिक शहर पोलिसांकडून शहरातील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यासोबतच कठोर कारवाईची समजही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या गोपनीय शाखेकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर भुजबळ फार्म येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फार्मवर येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सागितलं.