मुंबई :राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नसून अगोदर महायुती सरकारनं त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, खासदार वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते.
पक्षासोबत नव्हे तर राज्यासोबत गद्दारी :गद्दारी केवळ शिवसेना व शरद पवारासोबत नव्हे तर राज्यासोबत झाली आहे. महाराष्ट्र हे मोदी शाह यांचे गुलाम झाल्यासारखं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. आता हे महायुती सरकार हटवण्याची वेळ आलीय. मुंबईला दोन पोलिस आयुक्त आहेत तुम्हाला वाटत असेल तर आणखी पाच वाढवा, तुमच्या लाडक्या अधिकाऱ्यांना आयुक्त करा. मात्र कारभाराचे काय याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल. गद्दारांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना देखील सुरक्षा देण्यात आल्याची उपरोधिक टीका ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्र कधीच मोदी, शाहांचा होऊ देणार नाही :"जाहिरातबाजीवर पैसा उधळण्याऐवजी जनतेच्या सुरक्षिततेसाठी वापरण्यात यावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. अत्याचारी भ्रष्टाचारी सरकारविरोधात जनतेच्या न्यायालयात आम्ही आरोपपत्र दाखल करतोय, असं ते म्हणाले. येत्या दोन तीन दिवसांत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शाहू फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र कधीच मोदी, शाह यांचा होऊ देणार नाही," असं ठाकरे यांनी ठणकावलं.
जनता सरकारला सत्तेवरून हटवेल :राज्याच्या राजधानीत खुलेआम हत्या होत आहे. काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिजीत घोसाळकरांची हत्या झाली. राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घेत नाहीत. खरं तर ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. केवळ जाहिरातींच्या माध्यमांद्वारे जाहिराती देऊन नागरिकांसमोर वेगळं चित्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कितीही जाहिराती केल्या तरी खरं चित्र लपणार नाही. जाहिरातींसाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, जनता या सरकारला सत्तेवरून हटवेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
आमचं हिंदुत्व हृदयात राम व हाताला काम : "सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर संशय निर्माण होणं हे गंभीर आहे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला याचं हे प्रतीक आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जातीय तणाव निर्माण करुन लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल, मात्र जनता फसणार नाही. आमचं हिंदुत्व हृदयात राम व हाताला काम असं आहे. आम्हाला घरं पेटवायची नाहीत तर घरातील चूल पेटवायची आहे," असं ठाकरे म्हणाले. मोदी, शाह राज्याचे उद्योग गुजरातला पळवत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.