अमरावती- शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. मात्र राहुल गांधी आरक्षणासंदर्भात परदेशात जाऊन जे काही बोलले ते भयानक आहे. त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी केलं. डॉ. अनिल बोंडे यांच्या या विधानावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी कडाडून टीका केली.
महायुतीमधील नेत्यांकडून राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करण्याचे सत्र सुरू झाले. आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर खासदार अनिल बोंडे यांनीदेखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधीच नाही तर ज्ञानेश महाराव, श्याम मानव आणि बहुजनांच्या भावना दुखावणाऱ्यांना याबाबत जाणीव करून देणे गरजेचे असल्याचं डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
खासदार बोंडेंना दंगल घडवायची आहे- खासदार बोंडे यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी कडाडून टीका केली. आमदार ठाकूर यांनी म्हटले, " डॉ. अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडलं आहे. एखादा अडाणी व्यक्ती असं काही बोलत असेल तर समजू शकतो. मात्र डॉक्टर असणारी व्यक्ती असं काही विधान करत असेल तर नक्कीच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना तात्काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं. मूर्ख असणाऱ्या डॉक्टर अनिल बोंडे यांना महाराष्ट्रात आणि अमरावती दंगल घडवायची आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करतात, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.