मुंबई - मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. याच धर्तीवर 24 डिसेंबर 2016 ला एक भव्य-दिव्य कार्यक्रम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पुढं काय झालं? 7 वर्षांपासून या स्मारकाचं काम का रखडलं?, असा प्रश्न आता विचारला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईतील गेट वे ऑफ परिसरात दाखल झालेत. दरम्यान, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची, झटापट झालीय. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलंय. महाराजांच्या नावानं झालं तेवढं राजकारण पुरे झालं, पण बस्स झालं. येथून पुढं होऊ देणार नाही. 13 कोटी महाराष्ट्रातील जनतेला स्मारक नेमकं कुठंय हे कळलंच पाहिजे? असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
स्मारकाचं काम कुठपर्यंत आलंय?: गेटवे ऑफ इंडिया परिसरात छत्रपती संभाजीराजेंसह शेकडो कार्यकर्ते पोहोचलेत. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सुरुवातीला पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मात्र संभाजीराजेंनी विनंती केल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. यानंतर बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ही पोलिसांची दडपशाही आहे, हे बरोबर नाही, असंही ते म्हणालेत. तसेच गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. आम्ही इथे आंदोलन करण्यास आलेलो नाही. केंद्र सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारकाची घोषणा केली होती. पुढे 24 डिसेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केले. पण पुढं या स्मारकाचं काय झालं? याचा आम्ही शोध घेण्यासाठी आलो असल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ज्या अर्थी पंतप्रधान मोदींनी जलपूजन केलं त्याअर्थी तुमच्या परवानग्या, हरकत्या या पूर्ण झाल्या असा अर्थ होतो, असं म्हणत संभाजीराजेंनी सरकारवर प्रहार केला.
...मग महाराजांचे स्मारक का नाही?: पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आम्ही कायदा हातात घेणार नाही. पण आम्हाला जलपूजनाचा शोध घ्यायचा आहे, यासाठी पोलिसांनी अडवणूक करू नये. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे, मग स्मारक का नाही? असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केलाय. स्मारकाचं काम कुठपर्यंत झालंय हे आम्हाला पाहायचंय. 13 कोटी महाराष्ट्रातील जनतेला दाखवायचं आहे की नेमकं स्मारक कुठंय? स्मारकाचे काम कुठपर्यंत आलंय? मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात जन्माला आलोय. त्यामुळं त्यांचं स्मारक कुठे आणि कसं होतंय हे विचारण्याचा मला अधिकार आहे. दरम्यान, सरदार वल्लभाई पटेल यांचं स्मारक झालंय, मग महाराजांच्या स्मारक का नाही? असं सवाल संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला विचारलाय.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दिलेले 450 कोटी कुठे गेले?: छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला जात नाही, असं म्हणत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गडकोट आणि किल्ल्यांसह त्यांच्या संवर्धनासाठी सरकारने 450 कोटी देण्याची घोषणा केलीय. मात्र त्यातील किती पैसे आलेत आणि किती गड-किल्ल्यांचं संवर्धन झालंय, याचं उत्तर सरकारनं द्यावं. आमचे जे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कसली हुकूमशाही केली? हुकूमशाही तर पोलिसांनी केलीय, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. दरम्यान, ज्या ठिकाणी महाराजांच्या स्मारकांचे जलपूजन झालंय. त्या ठिकाणी 50 कार्यकर्त्यांसह संभाजीराजे पाहणीसाठी गेलेत, यासाठी पोलिसांनी परवानगीसुद्धा दिलीय.
हेही वाचाः